अखिल भारतीय महिला काँग्रेसच्या अध्यक्षा आणि माजी खासदार सुश्मिता देव यांनी आपल्या पदासह काँग्रेस सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे. देव यांनी ट्विट बायो बदलल्यानंतर त्यांनी काँग्रेस सोडल्याचं वृत्त समोर आलं होतं.
ADVERTISEMENT
काँग्रेसला सोडचिठ्ठी देणाऱ्या नेत्यांची मालिका सुरूच असून, जितीन प्रसाद आणि मणिपूरमधील काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष गोविंददास कोंथउजम यांच्यानंतर काँग्रेसला आणखी एक मोठा धक्का बसला आहे. अखिल भारतीय महिला काँग्रेसच्या अध्यक्षा सुश्मिता देव यांनी काँग्रेस सोडली असून, सोनिया गांधी यांच्याकडे राजीनामा सुपूर्द केला आहे.
माजी खासदार सुश्मिता देव यांनी ट्विट बायोमध्ये बदल केला. अखिल भारतीय महिला काँग्रेसच्या माजी अध्यक्षा असा बदल करण्यात आल्यानंतर सगळ्यांच्याच भुवया उंचावल्या होत्या.
याची चर्चा सुरू असतानाच सुश्मिता देव यांनी राजीनामा दिल्याचं वृत्त समोर आलं. माजी खासदार सुश्मिता देव यांनी काँग्रेसच्या हंगामी अध्यक्षा सोनिया गांधी यांच्याकडे राजीनामा सादर केला.
‘काँग्रेससोबतचा माझ्या तीन दशकांचा प्रवास मी मनात जपेन. काँग्रेस, पक्षाचे सर्व नेते, सदस्य आणि कार्यकर्त्याचे आभार मी आभार मानते. ज्यांमुळे माझी वाटचाल अविस्मरणीय ठरली. मॅडम (सोनिया गांधी), तुम्ही केलेल्या मार्गदर्शनासाठी आणि मला दिलेल्या संधीबद्दल आभारी आहे. मला समृद्ध करणाऱ्या अनुभवांना मी कायम महत्त्व देते’, असं सुश्मिता देव यांनी सोनिया गांधी यांना लिहिलेल्या पत्रात म्हटलं आहे.
तृणमूल काँग्रेसमध्ये प्रवेश
सुश्मिता देव यांनी आपण आता सार्वजनिक सेवेच्या नव्या वाटचालीला सुरूवात करणार आहोत असं म्हटलं होतं. त्यामुळे सुश्मिता देव यांचं पुढचं पाऊल काय असेल, याबद्दल चर्चा सुरू झाली. देव तृणमूल काँग्रेसमध्ये प्रवेश करणार असल्याचं वृत्त समोर आलं होतं.
अखिल भारतीय महिला काँग्रेसच्या अध्यक्षा राहिलेल्या सुश्मिता देव पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री आणि तृणमूल काँग्रेसच्या अध्यक्षा ममता बॅनर्जी यांची भेट घेणार असल्याचं म्हटलं गेलं. मात्र, दुपारी सुश्मिता देव यांनी अभिषेक बॅनर्जी यांच्या उपस्थिती तृणमूल काँग्रेसमध्ये प्रवेश केला.
ADVERTISEMENT