अफगाणिस्तानवर तालिबानने कब्जा केला आहे. आम्ही महिलांसोबत चुकीच्या पद्धतीने वागणार नाही असं आश्वासनही तालिबानने दिलं आहे. मात्र तालिबानचा क्रूर चेहरा आता जगासमोर आला आहे. तालिबानी दहशतवाद्यांनी अफगाणिस्तानमधील राष्ट्रीय ज्युनिअर महिला व्हॉलीबॉल संघाच्या खेळाडूचं शीर धडावेगळं केलं आहे. इंडिया टुडेने यासंदर्भातले वृत्त दिले आहे.
ADVERTISEMENT
अफगाणिस्तानच्या राष्ट्रीय ज्युनिअर महिला व्हॉलिबॉल संघाची खेळाडू महाजबीन हकिमी हिचा तालिबानी दहशतवाद्यांनी शिरच्छेद केला आहे. ऑक्टोबर महिन्याच्या सुरूवातीला हे भयंकर कृत्य तालिबानी दहशतवाद्यांनी केलं आहे. या प्रकरणाला वाचा फुटू नये म्हणून महजबीनच्या कुटुंबीयाना धमकीही देण्यात आली होती. त्यामुळे ऑक्टोबर महिन्याचे २० दिवस होऊनही ही माहिती समोर आली नव्हती. मात्र एका प्रशिक्षकाने नाव गुप्त ठेवण्याचा अटीवर ही धक्कादायक आणि क्रूर घटना समोर आणली आहे. इंडिया टुडेला या प्रशिक्षकाने एक मुलाखत दिली आहे. या मुलाखतीत ही धक्कादायक घटना त्यांनी सांगितली आहे.
काबूल म्युन्सिपालीटी व्हॉलिबॉल क्लबसाठी महजबीन खेळत होती. क्लबची ती एक उत्तम प्लेयर होती. काही दिवसांपूर्वी तिचा मृतदेह गळा चिरलेल्या अवस्थेत आढळून आला होता. यासंदर्भातले फोटो सोशल मीडियावरही व्हायरल झाले होते. तालिबानने जेव्हा ऑगस्ट महिन्यात अफगाणिस्तानवर कब्जा केला तेव्हा दोन व्हॉलीबॉल प्लेअर्स देश सोडून पळाल्या होत्या. ज्या मागे उरल्या त्यापैकी एक महजबीन होती. अफगाणिस्तान महिला राष्ट्रीय व्हॉलिबॉल संघाच्या प्रशिक्षकांनी ही माहिती दिली आहे.
तालिबानने अफगाणिस्तान काबीज केल्यापासून महिला खेळाडूंचा शोध घेण्यास सुरूवात केली. अफगाणी महिला व्हॉलीबॉल संघाच्या सदस्यांच्या शोधातही हे तालिबानी दहशतवादी होते. विदेशात प्रशिक्षण घेऊन आलेल्या आणि देशातल्या स्पर्धांमध्ये भाग घेतलेल्या महिला खेळाडूंनाही हे दहशतवादी शोधत होते. दरम्यान या धक्कादायक घटनेनंतर इतर सर्व महिला व्हॉलीबॉल खेळाडू या भीती आणि दहशतीच्या सावटाखाली आहेत.
अफगाण नॅशन वुमन्स व्हॉलीबॉल टीमची स्थापना 1978 मध्ये झाली. महिलांना खेळामध्ये प्रोत्साहन देण्यासाठी ही टीम सुरू करण्यात आली. अनेक मुली आत्तापर्यंत या टीमचा भाग झाल्या आहेत. मात्र महजबिनला ज्या प्रकारे तालिबानी दहशतवाद्यांनी शीरच्छेद करून मारून टाकलं ते पाहता इतर सर्व खेळाडू आता भीतीच्या सावटाखाली आहेत.
ADVERTISEMENT