सोमनाथ मंदिराची तोडफोड करणाऱ्या गझनीच्या कबरीवर आलो आहोत असं चिथावणीखोर ट्विट तालिबान्यांनी केलं आहे. तालिबान सरकारमधील हक्कानी नेटकवर्कचा म्होरक्या अनस हक्कानी याने आज महमूद गझनीच्या कबरीचं दर्शन घेतलं. त्यानंतर त्याने हे वादग्रस्त ट्विट केलं आहे. गझनी हा तोच मुस्लिम आक्रमण करणारा व्यक्ती आहे ज्याने वारंवार सोमनाथ मंदिर तोडलं.
ADVERTISEMENT
काय म्हटलं आहे हक्कानी याने?
आज मुहंमद गझनीच्या कबरीचं दर्शन घेतलं. मुहम्मद गझनी हा तोच योद्धा आहे ज्याने मुस्लिम सत्ता स्थापन व्हावी ही महत्त्वाकांक्षा तर बाळगलीच पण शिवाय सोमनाथ मंदिरही तोडलं. या आशयाचं ट्विट हक्काने याने केलं आहे.
हे मंदिर हिंदू समुदायाने वारंवार उभारलं, पण तरीही ते तोडलं गेलं. गझनीने भारतावर चौदावेळा स्वाऱ्या केल्या होत्या. त्यात अनेकदा त्याने हिंदू मंदिरांवर आणि खास करून सोमनाथ मंदिरावर हल्ला चढवला. मुघलांचा शेवटचा सम्राट औरंगजेब याने दिलेल्या इशाऱ्यानंतर 17 व्या शतकात हे मंदिर पुन्हा उद्ध्वस्त करण्यात आलं. मात्र भारताने जिद्द सोडली नाही. आज जे सोमनाथ मंदिर आपल्याला दिसतं आहे ते भारताचे पहिले गृहमंत्री सरदार पटेल यांच्या प्रयत्नांमुळेच.
का महत्वाचं आहे सोमनाथ मंदिर?
हे मंदिर 12 ज्योर्तिलिंगापैकी एक आहे. गुजरातच्या सौराष्ट्रमध्ये असलेलं हे मंदिर चंद्रदेवाने निर्मिलं होतं अशी अख्यायिका आहे. तसंच काही लोककथांच्या मते श्रीकृष्णाने ही याच ठिकाणी देहत्याग केला असंही सांगितलं जातं. त्यामुळेच या मंदिराचं महत्त्व मोठं आहेय
असं सांगितलं जातं की सोमनाथ मंदिर इसवी सन पूर्व काळात बांधण्यात आलं होतं.प्रतिहार कुळातला राजा नागभट्ट याने 815 मध्ये या मंदिराची पुनर्निर्मिती केली होती. तर 1024 आणि 1026 मध्ये गझनीने हे मंदिर तोडलं होतं. यानंतर 750 वर्षांनी अहिल्याबाई होळकर यांनी पुण्यातील पेशव्यांसोबत एकत्र येऊन या मंदिराचा जिर्णोद्धार केला. त्यावेळी त्यांनी मंदिराचा गाभारा हा जमीनीच्या आत तळघरात तयार केला. मूळ मंदिर स्थळावर सोमनाथ मंदिर ट्रस्टने तयार केलेलं नवं मंदिर आहे.
12 नोव्हेंबर 1947 ला दिवाळी होती. दिवाळीच्या शुभ मुहूर्तावर तत्कालीन गृहमंत्री सरदार वल्लभभाई पटेल हे जुनागढ या ठिकाणी आले होते. तिथे त्यानी सोमनाथ मंदिराची पुनर्निमिती केली जाईल अशी घोषणा केली. महात्मा गांधी यांनी त्यावेळी असा सल्ला दिला होता की मंदिराची निर्मिती करण्यासाठी लोकांकडून निधी गोळा करण्यात यावा. त्याचा एक ट्रस्ट स्थापण्यात आला होता. या ट्रस्टचे चेअरमन तत्कालीन खाद्य मंत्री के. एम. मुन्शी हे होते. 11 मे 1951 ला भारताचे राष्ट्रपती असलेले डॉ. राजेंद्र प्रसाद यांनी या मंदिरात शंकराच्या पिंडीची स्थापना केली.
ADVERTISEMENT