Tauktae चक्रीवादळात ज्यांचं ज्यांचं नुकसान झालं आहे त्या सगळ्यांना नुकसान भरपाई देणार असल्याचं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे. कुणालाही वंचित ठेवणार नाही असंही मुख्यमंत्र्यांनी आश्वस्त केलं आहे. गेल्या आठवड्यात महाराष्ट्राच्या सागरी किनाऱ्यावरील जिल्ह्यांना Tauktae चक्रीवादळाचा तडाखा बसून नुकसान झाले होते. या नुकसानग्रस्तांना निसर्ग चक्रीवादळ नुकसानग्रस्तांप्रमाणेच मदत दिली जाईल अशी महत्वपूर्ण घोषणा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केली आहे. 21 मे रोजी मुख्यमंत्र्यांनी स्वतः कोकण दौरा करून नुकसानीचा आढावा घेतला होता आणि तात्पुरती घोषणा न करता आढावा घेऊन व्यवस्थित मदत दिली जाईल व कुणालाही वंचित ठेवणार नाही असे आश्वस्त केले होते त्याप्रमाणे त्यांनी आज ही घोषणा केली.
ADVERTISEMENT
‘विरोधी पक्षनेत्यांसारखा मी वैफल्यग्रस्त नाही’ मुख्यमंत्र्यांचा फडणवीसांना टोला
कोकण दौरा जेव्हा मुख्यमंत्र्यांनी केला तेव्हा ते काय म्हणाले होते?
विरोधी पक्षनेत्यांसारखा मी वैफल्यग्रस्त नाही असं म्हणत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना टोला लगावला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे संवेदनशील आहेत ते महाराष्ट्राला नक्की मदत करतील असाही विश्वास मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी व्यक्त केला. चिवला बीच या ठिकाणी ते प्रसार माध्यमांशी बोलत होते. पंचनामे पूर्ण झाले आहेत, आढावा घेतल्यानंतर आम्ही Tauktae वादळात ज्यांना फटका बसला आहे त्यांना सगळ्यांना मदत केली जाणार आहे. नुकसानग्रस्तांसोबत सरकार आहे. त्यांच्यासाठी जे जे काही करायचं आहे ते आम्ही करणार आहोतच असंही त्यांनी त्यावेळी जाहीर केलं होतं. त्याप्रमाणेच आज त्यांनी घोषणा केली आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका करणार नाही ते संवेदनशील आहेत. ते गुजरातला गेले, महाराष्ट्रात आले नाहीत याबद्दल चर्चा होते आहे. मात्र मला खात्री आहे के ते महाराष्ट्राला नक्की मदत करतील. विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी जी टीका मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर केली त्याबद्दल जेव्हा त्यांना प्रश्न विचारण्यात आला तेव्हा ते म्हणाले की मी इथे विरोधकांच्या टीकेला उत्तर द्यायला आलेलो नाही मी वैफल्यग्रस्त नाही. मी माझ्या कोकणवासीयांना मदत करायला आलो आहे असंही उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे. एवढंच नाही तर माझा कोकण दौरा जरी चार तासांचा असला तरीही जमिनीवर येऊन पाहणी करतो आहे हेलिकॉप्टरमधून नाही असं म्हणत त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींनाही टोला लगावला होता.
ADVERTISEMENT