सिंधुदुर्ग: तौकताई चक्रीवादळ (Tauktae Cyclone) हे प्रचंड वेगाने घोंघावत असून त्याचा नेमका वेग किती असेल हे आपल्याला काही दृश्यांमधून समजू शकतं. कारण की, या वादाळामुळे संपूर्ण सिंधुदुर्ग (Sindhudurga) जिल्ह्यातील समुद्र (Sea) प्रचंड खवळला असल्याचं दिसून आलं आहे. आतापर्यंत याचे काही व्हीडिओ (Video) देखील समोर आलं आहेत. ज्यामधील दृश्य पाहून आपल्याला देखील धडकी भरेल.
ADVERTISEMENT
सध्या सिंधुदुर्गमधील मालवण आणि देवगड तालुक्यातील अनेक समुद्र किनाऱ्यांचे फोटो आणि व्हीडिओ आता समोर येत आहेत. या चक्रीवादळाने सध्या काही ठिकाणचा समुद्र प्रचंड खवळला असून उंचच उंच लाटा किनाऱ्यावर धडकताना दिसत आहेत.
तौकताई चक्रीवादळाने सिंधुदुर्ग जिल्ह्यातील अनेक ठिकाणी बरंच नुकसान झालं आहे. विशेषत: समुद्र किनारी असणाऱ्या अनेक गावांना या वादळाचा फटका बसला आहे.
तौक्ते चक्रीवादळामुळे सिंधुदुर्ग जिल्ह्यात सकाळी 11.30 वाजेपर्यंत एकूण 40 घरांचे नुकसान झाले आहे. तसेच 2 गोठ्यांचे नुकसान झाले आहे. 31 ठिकाणी झाडे पडली असून 3 शाळांचे नुकसान झाल्याची माहिती जिल्हा आपत्ती व्यवस्थापन कक्षाकडे प्राप्त झाली आहे.
या वादळाचा सर्वाधित फटका आतापर्यंत वैभववाडी तालुक्याला बसला आहे. वैभववाडी तालुक्यात एकूण 27 घरांचे नुकसान झाले आहे. तर एका ठिकाणी झाड पडले असून 2 शाळांचे आणि एका शेळीपालन शेडचे नुकसान झाले आहे.
इतर तालुक्यातील नुकसानीची आकडेवारी पुढील प्रमाणे आहे. दोडामार्ग तालुक्यात 8 झाडे पडली आहेत. सावंतवाडी तालुक्यात 6 ठिकाणी झाडे पडली आहेत. तर वेंगुर्ला तालुक्यात एका घराचे नुकसान झाले आहे. तर पाच झाडे पडली आहेत.
कुडाळ तालुक्यात 2 घरांचे नुकसान झाले असून एका गोठ्याचेही नुकसान झाले आहे. तर 4 ठिकाणी झाडे पडली आहेत. मालवण तालुक्यात 2 ठिकाणी झाडे पडली आहेत. तर एका पत्र्याच्या शेडचे नुकसान व एक विद्युत वाहिनीचे नुकसान झाले आहे. कणकवली तालुक्यात 9 घरांचे, एका शाळेचे नुकसान झाले आहे. तर देवगड तालुक्यात एका घराचे नुकसान झाले असून 2 ठिकाणी झाडे कोसळली असून एका ठिकाणी विद्युत वाहिनीचे नुकसान झाले आहे.
जेव्हा तौकताई वादळ हे सिंधुदुर्गच्या किनारपट्टी भागात पोहचलं तेव्हा येथील समुद्र खूपच खवळलेला दिसून आला. यावेळी येथे वाऱ्याचा वेग देखील प्रचंड होता.
कणकवली-आजरा मार्गावरील कलमठ येथे भले मोठे वडाचे झाड रस्त्यावर पडल्याने आचरा मार्गावरील वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली आहे. हे झाड विद्युत खांबांवर पडल्याने चार विद्युत खांब जमीनदोस्त झाले आहेत. त्याचप्रमाणे कलमठ गावातील विद्युत पुरवठा खंडित झाला असून झाड बाजूला करण्याचे युद्धपातळीवर सुरू आहे.
दुसरीकडे सावंतवाडी येथे झालेल्या वादळी वाऱ्याच्या पहिल्याच पावसात आंबोली घाटातील काही दरडीचा भाग व झाडे कोसळून रस्त्यावर आल्याचा प्रकार घडला आहे.
तौकताई चक्रीवादळाचं होणार ‘अत्यंत भीषण चक्रीवादळात’ रुपांतर
भारतीय हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार तौकताई चक्रीवादळ हे आता पुढील काही तासात अती तीव्र स्वरुपात बदलण्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. सध्या हे वादळ उत्तर-पश्चिम दिशेने वाटचाल करत असून ते 18 मे रोजी गुजरातच्या पोरबंदर येथे धडकण्याची शक्यता आहे. यावेळी केंद्र आणि किनारपट्टीत भागांमध्ये असणारी राज्यं हे चक्रीवादळाचा सामना करण्यासाठी तयारी करत आहेत.
आयएमडीच्या मते, अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्याने या चक्रीवादळाची निर्मिती झाली. आता हे चक्रीवादळ पोरबंदर ते नलिया दरम्यान, गुजरात किनारपट्टीवर 18 मेच्या आसपास धडकणार आहे. हे 16 ते 18 मे दरम्यान हे चक्रीवादळ अत्यंत तीव्र स्वरुपात घोंघावत राहणार आहे.
ADVERTISEMENT