कोरोना विषाणूच्या प्रादुर्भाव काळात देशात अनेकांना आपल्या नोकऱ्या गमवाव्या लागल्या. खासगी क्षेत्रासह अनेक शिक्षकांनाही आपलं काम सोडून रस्त्यावर येत फळं, भाजीपाला विकण्याची वेळ आली. हैदराबादच्या एका शिक्षकावर लॉकडाउनमध्ये नोकरी सुटल्यानंतर चक्क ड्रग्ज तस्करी करण्याची वेळ आली. शिवशंकर इसमपल्ली असं या शिक्षकांचं नाव असून ९१ किलो गांजाची तस्करी करत असताना नागपूर पोलिसांनी त्याला अटक केली आहे.
ADVERTISEMENT
नागपूरच्या बेलतरोडी पोलीस ठाण्यातील अधिकाऱ्यांना हैदराबादवरुन नागपूरमार्गे एक गाडी दिल्लीला मोठ्या प्रमाणात गांजा घेऊन जाणार असल्याची माहिती मिळाली होती. यानूसार नागपूर पोलिसांच्या पथकाने वर्धा मार्गावर सापळा रचला. आरोपी शिवशंकर DL – 4C – AD – 3665 या क्रमांकाच्या गाडीने प्रवास करत होता.
पोलीस अधिकाऱ्यांनी या गाडीला थांबवून झाडाझडती घेतली असता या गाडीत सुमारे ९१ किलो गांजा सापडला. सध्याच्या घडीला या गांज्याची किंमत बाजारात १३ लाखांच्या घरात असल्याची माहिती पोलिसांनी दिली. आरोपी शिवशंकरला पोलिसांनी अटक केली आहे.
ADVERTISEMENT