Pankja Munde यांनी आज राजीनामासत्र सुरू करणाऱ्या कार्यकर्त्यांशी मुंबईत संवाद साधला. प्रीतम मुंडे यांना केंद्रामध्ये मंत्रिपद मिळालं नाही. त्यामुळे पंकजा मुंडे आणि प्रीतम मुंडे यांच्या समर्थकांनी राजीनामा सत्र सुरू केलं. मात्र हे सगळे राजीनामे पंकजा मुंडे यांनी नाकारले आहेत. एवढंच नाही तर त्यांनी आक्रमक होत आपल्या कार्यकर्त्यांचं मनोबल वाढवण्याचंही काम केलं. रोखठोक भाषणात त्यांनी काय काय मुद्दे मांडले आपण जाणून घेऊया त्यांच्या भाषणातले दहा ठळक मुद्दे.
ADVERTISEMENT
पंकजा मुंडे यांच्या भाषणातले दहा मुद्दे
1) माझ्या मुलीने माझं नाव चालवावं असं माझ्या वडिलांना(गोपीनाथ मुंडे) वाटत होतं म्हणून त्यांनी मला राजकारणात आणलं का? तर मुळीच नाही. आपण ज्या लोकांसाठी लढा दिला. आपण ज्या लोकांसाठी न्याय्य मागण्या केल्या त्यांच्यासोबत लढण्यासाठी आपल्या पुढच्या पिढीतलाही माणूस हवा हे त्यांना माहित होतं त्यामुळे त्यांनी मला राजकारणात आणलं.
2) माझ्या राजकारणाचा पाया हा मला मंत्री करा, मला संत्री करा, माझ्या नवऱ्याला अमुकपद द्या.. माझ्या बहिणीला मंत्री करा यावर उभा राहिलेला नाही. माझा परिवार फक्त प्रीतम मुंडे आहेत का? तर मुळीच नाही. तुम्ही सगळे झटणारे कार्यकर्ते हे माझं कुटुंब आहे. या महाराष्ट्रातल्या कानाकोपऱ्यात मुंडे साहेबांवर प्रेम करणारा निष्पाप कार्यकर्ता माझा परिवार आहे.
3) काही लोक म्हणत होते वडिलांमुळे हिला पद देण्याची काय आवश्यकता? माझ्या वडिलांच्या पार्थिवाला अग्नी देत असताना लोकांच्या डोळ्यातला राग अंगार बनून वाहात होता. तिथे संघर्ष झाला. मी अग्नी देण्यासाठी उभी होते तेव्हा मलाही लोकांनी ढकललं. त्यावेळेस मुंडेसाहेबांवर प्रेम करणारे लोक मला म्हणत होते की ते फक्त तुमचे वडील नाही. आज आम्हीही आमच्या बापाला पोरके झालो आहोत.
4) माझं भांडण हे नियतीशी आहे.. मुंडेसाहेब गेले तेव्हा तो दोष नियतीचा होता. कारण त्यांना मिळालेलं पद हे सामान्य माणसाला मिळालेलं पद होतं. त्यांना मिळालेली सत्ता ही सामान्य माणसाला मिळालेली सत्ता होती.. त्यावेळी मी संघर्ष यात्रेतही ठरवलं की सत्ता सामान्य माणसाच्या पायी आणून ठेवल्याशिवाय मी राहणार नाही.
5) मी मुंडेसाहेबांची मुलगी आहे, मी मुंडेसाहेबांचा वारसा आहे हे मी कधी म्हटलं आहे का? केंद्रामध्ये मला मंत्रिमंडळात घेणार होते.. मात्र मी सन्मानाने ते पद नाकारलं. मंत्रिपदाला जर मी तेव्हा नकार दिला होता तर आता मंत्रिपदासाठी मी राजीनामा देणार आणि तुमचे राजीनामे घेणार आहे का?
6) मी लालची नाही. मला लालसा नाही. मला कोणत्याही पदाची लालसा नाही. मी स्वार्थी नाही मला कुणाचंही राजकारण संपवून स्वतःचं राजकारण करायचं नाही. मी गोपीनाथ मुंडे जगणारी व्यक्ती आहे त्यामुळे तुमचं सगळ्यांचं माझ्यावर प्रेम आहे
7) मला कोणतंही दबवतंत्र करायचं नाही, दबावतंत्र करण्यासाठी ही जागा कमी पडणार आहे.
8) आम्ही कधीच कोणाच्या समोर काहीही मागितलं नाही. मला दिल्लीत कोणीही झापलं नाही, मोदींनी सन्मानपूर्वक वागणूक दिली. नड्डा साहेबांनी विश्वास दाखवला, तुम्ही कार्यकर्त्यांची समजून काढा असंही त्यांनी मला सांगितलं.
9) धर्मयुद्ध करायला गेलं तर माझेच सैनिक आडवे पडतील हे मला माहिती आहे. कौरवांच्या सोबत असलेले सारथीही मनाने त्यांच्यासोबत नव्हते. पण पांडवांकडे श्रीकृष्ण होता, तुम्ही माझे श्रीकृष्ण व्हा.
10) मोठा नेता कायम मोठा त्याग करत असतो हे लक्षात ठेवा. मला प्रवास खडतर दिसतो आहे. मी हरले पण मी संपले नाही. मी संपले असते तर मला संपवण्याचे प्रयत्नच झाले नसते. प्रीतमताई लायक असताना त्यांना मंत्रिपद मिळालं नाही. कराड यांना मंत्रिपद मिळालं आहे. कराड 65 वर्षांचे आहेत मी 42 वर्षांची आहे. मी त्यांचा अपमान करू का?
ADVERTISEMENT