अमरावतीच्या अपक्ष खासदार नवनीत राणा यांची खासदारकी धोक्यात आली आहे. नवनीत राणा यांचं जात प्रमाणपत्र मुंबई उच्च न्यायालयाने रद्द केलं आहे. २०१९ लोकसभा निवडणुकीत नवनीत राणा यांनी शिवसेनेच्या आनंदराव अडसूळ यांचा पराभव केला होता. अनुसुचित जातीसाठी राखीव असलेल्या अमरावती मतदार संघात राणा यांनी बनावट जात प्रमाणपत्र दाखवल्याचा आरोप करत अडसूळांनी हायकोर्टात याचिका दाखल केली होती.
ADVERTISEMENT
या याचिकेवर सुनावणी दरम्यान मुंबई उच्च न्यायालयाने राणा यांचं प्रमाणपत्र रद्द केलं आहे. यावेळी नवीनत राणा यांना दोन लाखांचा दंड आणि सहा आठवड्यात सर्व प्रमाणपत्र सादर करण्याचे आदेश दिले आहेत. २०१४ सालीही नवनीत राणा या मतदार संघातून अपक्ष उमेदवार म्हणून लढल्या होत्या. दरम्यान या प्रकरणात नवनीत राणा यांच्या वकीलांनी कोर्टाकडे कागदपत्र सादर करण्यासाठी वेळ मागितला आहे. या निर्णयाला नवनीत राणा सर्वोच्च न्यायालयात आव्हान देण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
आनंदराव अडसुळ यांनी दाखल केलेल्या याचिकेवर मुंबई उच्च न्यायालयात जस्टीस धनुका आणि जस्टीस बिश्त यांच्या खंडपीठासमोर सुनावणी झाली. यावेळी खंडपीठाने जात प्रमाणपत्र घेताना खोटी आणि बनावट कागदपत्र सादर केल्याचं मत नोंदवलं. २०१७ साली आनंदराव अडसूळ यांनी याचिका दाखल केली होती. उच्च न्यायालयाच्या या निर्णयानंतर खासदार नवनीत राणा यांची खासदारकी धोक्यात असल्याचं बोललं जातंय. त्यामुळे या प्रकरणी नवनीत राणा आता आपली कशी मांडतात हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.
ADVERTISEMENT