राज्यात आरोग्य सेवा भरती परीक्षेवरून गोंधळ माजलेला असताना आता शिक्षक पात्रता परीक्षा अर्थात टीईटी (Teacher Eligibility Test) परीक्षा सलग तिसऱ्यांदा पुढे ढकलण्यात आली आहे. ३० ऑक्टोबर रोजी होणार ही परीक्षा आता दिवाळीनंतर घेतली जाणार आहे. परीक्षेची सुधारीत तारीख महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेने जाहीर केली आहे.
ADVERTISEMENT
राज्यात शिक्षकांच्या पात्रतेसाठी टीईटी परीक्षा घेतली जाते. ही परीक्षा ३० ऑक्टोबर रोजी होणार होती. मात्र, महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेने परीक्षेच्या तारखेत पुन्हा बदल केला आहे. पोट निवडणुकीमुळे परीक्षेच्या वेळेत बदल करण्यात आला असून, आता ही परीक्षा २१ नोव्हेंबर रोजी घेतली जाणार आहे.
३० ऑक्टोबर रोजी नांदेड जिल्ह्यातील देगलूर-बिलोली मतदारसंघाची पोटनिवडणूक आहे. पोटनिवडणुकीमुळे टीईटी परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
तारीख पे तारीख…
सुरुवातीला १० ऑक्टोबर रोजी परीक्षा आयोजित करण्यात आली होती. मात्र, त्याच दिवशी केंद्रीय लोकसेवा आयोग अर्थात यूपीएससीची परीक्षा असल्याने राज्य परीक्षा परिषदेने टीईटी परीक्षा पुढे ढकलत ३१ ऑक्टोबर रोजी घेण्याचं नियोजन केलं.
दरम्यान, ३१ ऑक्टोबरला राज्याच्या आरोग्य विभागाची परीक्षा ठेवण्यात आली. त्यामुळे परीक्षा परिषदेने पुन्हा टीईटी परीक्षेच्या तारखेत बदल केला. ३१ ऑक्टोबर ऐवजी ३० ऑक्टोबरला परीक्षा घेण्याचं निश्चित करण्यात आलं होतं. मात्र, त्याच दिवशी पोटनिवडणूक असल्यानं परीक्षा पुन्हा पुढे ढकलण्याचा निर्णय घेण्यात आला.
आता टीईटी परीक्षा दिवाळीनंतर म्हणजेच २१ नोव्हेंबरला होणार असून, तसं वेळापत्रक महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेने प्रसिद्ध केलं आहे. राज्यातून ३ लाख ३० हजार ६४२ उमेदवार टीईटी परीक्षा देणार आहेत. राज्यात 5 हजार परीक्षा केंद्रांवर ही परीक्षा घेतली जाणार आहे.
ADVERTISEMENT