TET Exam scam : पात्र उमेदवारांच्या यादीत घुसवली 500 नावे; असा करण्यात आला घोटाळा…

मुंबई तक

• 07:37 AM • 21 Dec 2021

पुणे पोलिसांनी पर्दाफाश केलेल्या टीईटी परीक्षा घोटाळ्यांचा गुंता दिवसेंदिवस वाढत चालला आहे. टीईटी परीक्षा घोटाळ्याचे धागेदोरे 2018 मध्ये जाऊन पोहोचले असून, पोलिसांनी आतापर्यंत जीए कंपनीच्या दोन अधिकाऱ्यांसह परीक्षा विभागाच्या दोन आजी-माजी आयुक्तांसह एकूण सहा जणांना अटक केली आहे. या घोटाळ्यात अनेकांचा सहभाग असल्याचा संशय असून, दोन आयुक्तांचाच सहभाग आढळून आल्याने मोठी खळबळ उडाली आहे. त्याचबरोबर […]

Mumbaitak
follow google news

पुणे पोलिसांनी पर्दाफाश केलेल्या टीईटी परीक्षा घोटाळ्यांचा गुंता दिवसेंदिवस वाढत चालला आहे. टीईटी परीक्षा घोटाळ्याचे धागेदोरे 2018 मध्ये जाऊन पोहोचले असून, पोलिसांनी आतापर्यंत जीए कंपनीच्या दोन अधिकाऱ्यांसह परीक्षा विभागाच्या दोन आजी-माजी आयुक्तांसह एकूण सहा जणांना अटक केली आहे. या घोटाळ्यात अनेकांचा सहभाग असल्याचा संशय असून, दोन आयुक्तांचाच सहभाग आढळून आल्याने मोठी खळबळ उडाली आहे. त्याचबरोबर 2018 मध्ये घेण्यात आलेल्या टीईटी परीक्षेत घोटाळा झाल्याचंही समोर आलं आहे.

हे वाचलं का?

सुखदेव डेरे आणि जीए कंपनीच्या अधिकाऱ्यांपर्यंत पोलीस कसे पोहोचले?

पुण्याचे पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी आणखी तीन आरोपींना अटक केल्यानंतर आज पत्रकार परिषद घेतली. या परिषदेत त्यांनी 2018 मध्ये झालेल्या टीईटी परीक्षा घोटाळ्यासंदर्भात माहिती दिली. पुण्याच्या सायबर पोलीस ठाण्यात म्हाडा पेपर फुटीसंदर्भात दाखल असलेल्या गुन्ह्यात अटक करण्यात आलेल्या जीए सॉफ्टवेअर कंपनीचा संचालक प्रितीश देशमुख व त्याचे सहकारी एजंट संतोष हरकळ व अकुश हरकळ यांची चौकशी करण्यात आली.

या प्रकरणाचा तपास चालू असताना तसेच 2019-20 मध्ये घेण्यात आलेल्या शिक्षक पात्रता परीक्षेतील घोटाळ्यासंदर्भात अटक असलेले आरोपी अभिषेक सावरकर यांची चौकशी करण्यात आली. त्यात 2018 मध्ये घेण्यात आलेल्या शिक्षक पात्रता परिक्षा (TET) मध्येही त्यांनी त्यावेळी महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या परीक्षा घेण्याचं कंत्राट असलेल्या जी.ए. सॉफ्टवेअर टेक्नॉलॉजी प्रा. लि. कंपनीच्या तत्कालीन मॅनेजर व त्याच्या सहकाऱ्याच्या मदतीने अपात्र परिक्षार्थ्यांकडून पैसे घेऊन निकालामध्ये फेरफार केली आणि त्यांची नावे पात्र उमेदवारांच्या यादीत टाकल्याचं समोर आलं, असं पोलिसांनी सांगितलं.टीईटी परीक्षा घोटाळ्याचे धागेदोरे 2018 मध्ये जाऊन पोहोचले आहेत.

500 विद्यार्थ्यांकडून घेतले प्रत्येकी 50 ते 60 हजार…

हे प्रकरण समोर आल्यानंतर सायबर पोलीसांनी याची माहिती राज्य शिक्षण आयुक्तांना याची माहिती दिली. त्यानंतर राज्य परीक्षा परिषदेचे सध्याचे अध्यक्ष दत्तात्रय गोविंद जगताप यांनी तक्रार दाखल केली होती. ‘महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेतर्फे शिक्षक पात्रता परीक्षा, टाइपिंग व शार्ट हेड परीक्षा, ईबीसी शिष्यवृत्ती परीक्षा, खात्यातंर्गत सेवा परीक्षा, डी.एल.ई.डी. इत्यादी परीक्षा कंत्राटी कंपन्यामार्फत घेतल्या जातात. 15 जुलै 2018 रोजी शिक्षक पात्रता परीक्षा जीए सॉफ्टवेअर कंपनीने घेतली होती.

या परीक्षेचा अंतिम निकाल 12 ऑक्टोबर 2018 रोजी जाहीर करण्यात आला होता. त्या कंपनीचा महाराष्ट्रातील प्रमुख अश्विन कुमार याच्याकडे परीक्षेचा घेण्याची आणि निकाल महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या संकेतस्थळावर (https://mahatet.in) प्रसिद्ध करण्याची जबाबदारी होती. याचा फायदा घेत जी.ए. कंपनीचा व्यवस्थापक अश्विन कुमारने राज्य परीक्षा परिषदेच्या तत्कालीन आयुक सुखदेव डेरे (6 ऑगस्ट 2016 ते 31 ऑगस्ट 2018) आणि तुकाराम सुपे (31 ऑगस्ट 2018 ते 17 डिसेंबर 2021) यांच्यासह सहकारी प्रितीश देशमुख, अभिषेक सावरकर, सौरभ त्रिपाठी, संतोष हरकळ व अंकुश हरकळ या सर्वांनी संगनमताने 2018 मध्ये घेण्यात आलेल्या शिक्षक पात्रता परीक्षेच्या निकालात अपात्र असलेल्या उमेदवारांना पात्र ठरवून त्यांची नावं पात्र उमेदवारांच्या यादीत समाविष्ट केली.

प्राथमिक माहितीनुसार या सर्वांनी अपात्र उमेदवारांना पात्र ठरवण्यासाठी त्यावेळी सुमारे 500 उमेदवारांकडून प्रत्येकी 50 ते 60 हजार रुपये घेतले. परीक्षेतील गैरव्यवहारातून जमा झालेले पैसे आरोपींनी आपआपसात वाटून घेतले आणि खोटा निकाल प्रसिद्ध केला. महत्त्वाचं म्हणजे मूळ निकालाच्या यादीत या उमेदवारांची नावे समाविष्ट करण्यात आली. याप्रकरणी पोलिसांनी जगताप यांच्या फिर्यादीवरून सायबर पोलीस ठाण्यात (गु.र.नं ५८/२०२१. भा.द.वि.कलम ४०६, ४०९ ४२० ४६५, ४६७, ४६८ ३४ सह माहिती तंत्रज्ञान कायदा कलम ६६ (डी) सह महाराष्ट्र विद्यापीठाच्या मंडळाच्या व इतर विनिर्दिष्ट परिक्षांमध्ये होणाऱ्या गैरप्रकारास प्रतिबंध करण्याबाबत अधिनियम (१९९० सुधारीत) कलम ७.८) गुन्हा दाखल केला आहे.

सुखदेव डेरेंवर काय आहे आरोप?

या प्रकरणात माजी आयुक्त सुखदेव डेर (वय 61 वर्षे, रा. सुखयश निवास, सार्थक हॉटेलच्या मागे, अकोले बायपास, संगमनेर, जि. अहमदनगर) याचा सहभाग असल्याचं पोलिसांना आढळून आलं. त्यामुळे त्यांना अटक करण्यात आली आहे. त्याशिवाय या गुन्ह्यातील आरोपी व जी.ए. सॉफ्टवेअर टेक्नॉलॉजी कंपनीचा तत्कालीन व्यवस्थापक अश्विन शिवकुमार कुमार (वय 49 वर्षे, रा. घर नं 405, नदवी मुख्य आळी एचआरबीआर ले-आऊट, कल्याणी नगर, बंगळुरू) यालाही गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक राजुरकर यांच्या पथकाने बंगळुरूमध्ये जाऊन अटक केली.

    follow whatsapp