बॉम्बस्फोटातले आरोपी, दाऊदचे सहकारी यांच्या सोबत व्यवहार करून मनी लाँडरिंग करण्याच्या आरोपाखाली नवाब मलिक यांना अटक झाली. त्यानंतर अख्खं राज्य सरकार त्यांच्या पाठिशी उभं राहिलं आहे असं म्हणत विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी ठाकरे सरकारवर टीका केली आहे. दाऊदला सहकार्य केलं, मुंबईच्या खुन्याशी ज्यांनी व्यवहार केला त्यांना वाचवण्यासाठी सरकार उभं राहिलं आहे. देशात असं कधीही घडलं नाही. पोलीस कस्टडीत गेल्यानंतर मंत्रिपदावर व्यक्ती कायम राहिली आहे असं देशात कधीच घडलं नाही. ज्या सरकारचे प्रमुख शिवसेनेचे नेते आहेत ते सरकार ते मुंबईच्या खुन्यांच्या पाठिशी उभे आहेत. त्यामुळे नवाब मलिकांच्या राजीनाम्याची मागणी आम्ही लावून धरणार आहोत असंही फडणवीस यांनी सांगितलं.
ADVERTISEMENT
भाजप नवाब मलिक यांच्या राजीनाम्यासाठी सभागृहात संघर्ष करेल. या शिवाय अनेक महत्वाचे मुद्दे या अधिवेशनात मांडले जाणार आहेत. आम्हाला चर्चा करण्यामध्ये रस आहे. अनेक दिवसांनंतर सतरा-अठरा दिवस चालणारं अधिवेशन आम्हाला मिळालं आहे. महाराष्ट्राच्या जनतेचे प्रश्न तिथे मांडले गेले पाहिजेत हीच आमचीही भूमिका आहे. मात्र सरकारी पक्षाचीही ही जबाबदारी आहे की चर्चा झाली पाहिजे. अन्यथा ओबीसींच्या प्रश्नांवर बोललं तर बारा लोकांना निलंबित केलं. विद्यापीठाचं विधेयक विरोधकांची मुस्कटदाबी करून काढलं गेलं. या अधिवेशनातही सरकार असंच वागणार असेल तर आम्हालाही विचार करावा लागेल. अन्यथा आम्ही लोकशाही मानणारे आहोत असंही फडणवीस यांनी स्पष्ट केलं.
महाराष्ट्रातला शेतकरी हवालदिल आहे, तरीही राज्यातील शेतकऱ्यांचे वीज कनेक्शन तोडले जात आहेत. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या शब्दाला राज्यात कोणतीही किंमत राहिलेली नाही. मागच्या ते मागच्या अधिवेशनात त्यांनी सांगितलं वीज कापणार नाही, मात्र शेवटच्या दिवशीच वीज तोडणी सुरू केली. मागच्या अधिवेशनात त्यांनी सांगितलं होतं की वीजेचे कनेक्शन कापणार नाही. मात्र आता जणू स्पर्धा लागल्याप्रमाणे वीज कनेक्शन तोडले जात आहेत. त्यामुळे शेतकऱ्याला उभं पिक जळताना पहावं लागतं आहे. आधी आस्मानी संकट दोन वर्ष आता हे सुल्तानी संकट शेतकऱ्यावर आलं आहे असंही देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे.
25 हजार कोटींचा आयटी घोटाळा फडणवीस सरकार सरकारच्या काळात झाला आहे असा आरोप झाला आहे. त्याबाबत विचारलं असता आयटी घोटाळ्याची खुशाल चौकशी करा असंही फडणवीस यांनी म्हटलं आहे. तसंच आम्ही विरोधक म्हणून चहा पानावर बहिष्कार घालत आहोत अशीही भूमिका त्यांनी आज स्पष्ट केली आहे.
भाजप आणि मित्र पक्षांची अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला बैठक झाली. अधिवेशनात कोणते विषय मांडायचे याची चर्चा आम्ही केली आहे. महाराष्ट्रात जी परिस्थिती समोर येते आहे त्यावरही प्रामुख्याने विचार झाला. देशाच्या इतिहासात जे घडलं नाही ते महाराष्ट्रात पाहायला मिळतं आहे असंही देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी म्हटलं आहे.
ADVERTISEMENT