महाराष्ट्र शासनाने तुकाराम सुपे यांचं निलंबन केलं आहे. टीईटी गैरव्यवहार प्रकरणी ही कारवाई ठाकरे सरकारने केली आहे. तुकाराम सुपे, आयुक्त, महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद, पुणे यांना अटकेच्या दिनांकापासून निलंबित करण्यात आले असल्याची माहिती शालेय शिक्षण मंत्री प्रा.वर्षा गायकवाड यांनी दिली.
ADVERTISEMENT
हा आदेश अंमलात असेल तेवढ्या कालावधीत तुकाराम सुपे, आयुक्त, महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद, पुणे यांचे मुख्यालय पुणे येथे राहील आणि त्यांना शासनाच्या पूर्वपरवानगीशिवाय मुख्यालय सोडता येणार नाही. निलंबित असताना तुकाराम सुपे यांनी खासगी नोकरी स्वीकारणे किंवा व्यवसाय करणे अनुज्ञेय असणार नाही. निलंबित असताना त्यांनी खासगी नोकरी स्वीकारल्यास किंवा व्यवसाय केल्यास ते गैरवतणुकीबाबत दोषी ठरतील आणि तदनुसार कारवाईस पात्र ठरतील, असेही याबाबतच्या आदेशात म्हटले आहे.
सुपेंनी असा केला टीईटी घोटाळा…
म्हाडा पेपरफुटी प्रकरणात पोलिसांनी जी.ए. सॉफ्टवेअर कंपनीचा संचालक प्रितीश देशमुख याच्यासह एजंट संतोष हरकळ आणि अंकुश हरकळ यांना पुणे पोलिसांनी अटक केली होती. त्यांची चौकशी करत असताना त्यांनी 2019-2020 मध्ये घेण्यात आलेल्या शिक्षक पात्रता (TET) परीक्षेत विद्यार्थ्यांकडून पैसे घेऊन निकाल बदलल्याचं सांगितलं. महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेचे आयुक्त तथा अध्यक्ष तुकाराम सुपे आणि शिक्षण विभागातील सल्लागार अभिषेक सावरीकर यांच्या मदतीने हे केल्याचं त्यांनी सांगितलं.
त्यानंतर पोलिसांनी 16 डिसेंबर रोजी तुकाराम सुपे आणि अभिषेक सावरीकर यांना चौकशीसाठी बोलावलं होतं. त्यांची सायबर सेल पोलीस ठाण्यात चौकशी करण्यात आली. त्यांनी घोटाळ्याची कबुली दिली. परीक्षा घेण्याची जबाबदारी असलेल्या जी.ए. सॉफ्टवेअर्स कंपनीचा संचालक प्रितीश देशमुख याला हाताशी धरून त्याच्यासोबत असलेल्या संतोष हरकळ व अंकुश हरकळ (रा. सिंदखेडराजा, जि. बुलढाणा) या एजंटच्या मदतीने परीक्षा देणाऱ्या उमेदवारांची माहिती मिळवल्याचं त्यांनी कबूल केलं.
परीक्षा देणाऱ्या उमेदवारांना परीक्षेत पास करण्याचं आश्वासन देऊन त्यांच्याकडून प्रत्येकी 50 ते 1 लाख अशा रकमा घेतल्या. यामाध्यमातून जवळपास 4 कोटी 20 लाख रुपये जमा झाले होते. हे पैसे आरोपींनी आपआपसात वाटून घेतले. यात तुकाराम सुपे यांनी 1.70 कोटी, प्रितीश देशमुख 1.25 कोटी, अभिषेक सावरीकर 1.25 कोटी घेतले. पोलिसांनी केलेल्या चौकशी दरम्यान तुकाराम सुपे आणि अभिषेक सावरीकर यांनी गुन्ह्याची कबुली देताना हे सांगितलं.
ADVERTISEMENT