अनधिकृत फेरीवाल्यांविरुद्ध कारवाई दरम्यान दोन बोटं गमावलेल्या ठाणे महापालिकेच्या सह आयुक्त कल्पिता पिंपळे आता सावरल्या आहेत. ठाण्यातील रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरु असून यातून सावरले की मी पुन्हा फेरीवाल्यांविरुद्ध कारवाईसाठी रस्त्यावर उतरणार आहे असा निर्धार पिंपळे यांनी व्यक्त केला आहे.
ADVERTISEMENT
ठाण्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे, महापौर नरेश म्हस्के, विधान परिषद आमदार रविंद्र पाठक यांनी पिंपळे यांची भेट घेऊन त्यांच्या तब्येतीची चौकशी केली. “बेकायदा फेरीवाल्यांना आपण घाबरुन राहिलो तर उद्या फेरीवाले त्याचा फायदा उठवतील. त्यांच्यावर कारवाई करणं हे माझं कामच आहे. त्यामुळे घाबरणार नाही, डगमगणार नाही. पूर्णपणे बरी झाले की मी फेरीवाल्यांविरुद्ध कारवाईसाठी पुन्हा मैदानात उतरणार आहे”, अशा प्रतिक्रीया पिंपळे यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना दिली.
दरम्यान पिंपळे यांच्यावर शस्त्रक्रीया करुन त्यांच्या तुटलेल्या बोटापैकी एक बोट जोडण्यात आलं आहे. पुढील ४८ तास पिंपळे यांना डॉक्टरांच्या देखरेखीखाली रहावं लागणार आहे. दरम्यान पिंपळे यांच्यावर हल्ला करणाऱ्या आरोपी अमरजीत यादवला ठाणे न्यायालयाने आज ४ सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.
ADVERTISEMENT