ठाण्यात काही दिवसांपूर्वी मीरा चोप्रा या अभिनेत्रीने लस घेण्यासाठी कोविड सेंटरचं बनावट ओळखपत्र बनवून घेतल्याचं प्रकरण समोर आलं होतं. सोशल मीडियावर आणि विरोधकांनी या प्रकरणी गदारोळ केल्यानंतर ठाणे महानगरपालिकेने या प्रकरणाच्या चौकशीचे आदेश दिले. या चौकशी समितीचा अहवाल समोर आला असून यात आणखी एका अभिनेत्रीचं नाव समोर आलंय.
ADVERTISEMENT
लस घेण्यासाठी अभिनेत्री झाली कोविड सेंटरची सुपरवायजर, ठाण्यातील धक्कादायक प्रकार उघड
अभिनेत्री सौम्या टंडन हीने देखील लस घेण्यासाठी अशाच पद्धतीने बनावट ओळखपत्र बनवून घेतल्याचं समोर आलंय. भाभीजी घर पर है या मालिकेत अनिता भाभी हे पात्र साकारणारी सौम्या टंडन हिने लस घेतली की नाही हे चौकशी समितीने स्पष्ट केलेलं नाही. परंतू सौम्या टंडनला लगेच लस देण्यासाठी पालिकेच्या अधिकाऱ्यांनी नकार दिल्यामुळे ओम साई केअर कंपनीमार्फत बनावट आयडी कार्ड बनवण्यात आल्याचा आरोप तिच्यावर होतो आहे. आतापर्यंत चौकशी समितीच्या अहवालात २१ जणांना बनावट ओळखपत्राच्या आधारावर लस देण्यात आल्याचं समोर आलंय.
एकीकडे लसीच्या तुटवड्यामुळे सामान्य नागरिकांना लस मिळत नसताना काही सेलिब्रेटींसाठी अशा पद्धतीने बनावट आयडी कार्डाद्वारे लस दिली जात असल्यामुळे सर्व स्तरातून नाराजी व्यक्त करण्यात आली होती. डॉ. विश्वनाथ केळकर यांच्या अध्यक्षतेखाली ठाणे महानगरपालिकेने या प्रकरणाची चौकशी समिती नेमली होती.
ठाणे महापालिकेच्या चौकशी समितीच्या अहवालात काही महत्वाच्या बाबी समोर आल्या आहेत.
१) ठाण्याच्या पार्किंग प्लाझा येथील कोविड सेंटरमध्ये कर्मचारी पुरवण्याचं काम ओम साई आरोग्य प्रा.लिमीटेड या कंपनीकडे आहे. चौकशी समितीने आपल्या अहवालात या कंपनीवर घडलेल्या प्रकाराबद्दल ठपका ठेवला आहे.
२) ओम साई आरोग्य केअरचे कर्मचारी आणि अधिकाऱ्यांवर या अहवालात ठपका ठेवण्यात आला आहे.
३) बनावट ओळखपत्र बनवणे, कागदपत्र बनावट आहेत हे माहिती असूनही लस देणे
४) शासकीय नियमांचा भंग
५) जाणीवपूर्व गुन्हेगारी वृत्तीने काम असे गंभीर मुद्दे अहवालात नमूद करण्यात आले आहेत.
महत्वाची गोष्ट म्हणजे ओम साई आरोग्य कंपनीचे कोणतेही अधिकारी किंवा कर्मचारी या चौकशी समितीसमोर हजर राहिले नाहीत. मीरा चोप्राने आपल्यावरील सर्व आरोप फेटाळले असले तरीही समितीच्या अहवालात सौम्या टंडन या आणखी एका अभिनेत्रीचं नाव समोर आल्यामुळे ठाणे महापालिकेच्या कोविड सेंटरमधला गैरकारभार पुन्हा एकदा समोर आला आहे. आता या प्रकरणात ओम साई आरोग्य कंपनीवर काय कारवाई करण्यात येते याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे.
लस घेण्यासाठी कोविड सेंटरमध्ये सुपरवाजयर : अभिनेत्री मीरा चोप्राने आरोप फेटाळले
ADVERTISEMENT