बुलढाणा : भारत जोडो यात्रेत हिंगोलीमध्ये बोलताना काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याबद्दल केलेल्या विधानानंतर राज्यातील राजकारण ढवळून निघालं. भाजपकडून काँग्रेसला आणि राहुल गांधी यांना लक्ष्य करण्यात आलं. तर राहुल गांधी यांनी भाजप, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि सावरकर यांच्यावर टीका करत प्रत्युत्तर देण्यात आलं.
ADVERTISEMENT
अखेरीस चार ते पाच दिवसांनंतर हा वाद शमला असं वाटत असतानाच महाराष्ट्रातून जाता-जाता काँग्रेस नेते आणि माजी केंद्रीय मंत्री जयराम रमेश यांनी या मुद्द्यावरुन पुन्हा एकदा भाजपला डिवचलं आहे. आज भारत जोडो यात्रेचा महाराष्ट्रातील शेवटचा दिवस आहे. जळगावमधील जामोद येथे भारत जोडो यात्रेचा महाराष्ट्रातील समारोप होत आहे. सोमवारी आणि मंगळवारी राहुल गांधी गुजरातच्या दौऱ्यावर असल्याने यात्रा मध्यप्रदेशच्या सीमेवर थांबणार आहे.
यावेळी आज भारत जोडो यात्रेतील काँग्रेस नेत्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी बोलताना जयराम रमेश म्हणाले, आपण फिरुन फिरुन सावरकरांच्या मुद्द्यावर येत आहोत. पण हा विषय आता इथेच थांबवायला हवा. मात्र भाजपला सांगणं आहे की, ज्यादिवशी तुम्ही आमच्या सर्व नेत्यांबद्दल खोटा इतिहास सांगणे बंद कराल, त्या दिवशी आम्हीही तुमच्या नेत्यांबद्दल खरा इतिहास सांगणं बंद करू, असं म्हणतं त्यांनी भाजपला डिवचलं.
राहुल गांधी यांनी नेमकं काय म्हटलं होतं?
राहुल गांधी यांनी हिंगोलीतल्या सभेत वीर सावरकर यांचा उल्लेख माफीवीर असा केला. एवढंच नाही तर वीर सावरकर हे ब्रिटिशांकडून पेन्शन घेत होते. त्यांनी तुरुंगातून बाहेर पडण्यासाठी इंग्रजांची माफी मागितली असा दावा केला. तसंच गुरूवारी त्यांनी एकत्र पत्रही दाखवलं त्यामध्ये त्यांनी वीर सावरकर यांनी नेमका काय उल्लेख केला होता ते वाचून दाखवलं. त्यावरून आता महाराष्ट्रात राजकारण रंगलं होतं
ADVERTISEMENT