मोफत शस्त्रक्रिया शिबिरं आणि जे. जे. तील नेत्र चिकित्सा विभागातून हजारो नागरिकांना नवी दृष्टी मिळवून देणाऱ्या डॉ. तात्याराव लहाने यांनी आता जे.जे.मधील एका बदकाच्या डोळ्यांवर औषधोपचार केले, ज्यामुळे बदकालाही दिसू लागलं. या बातमीमुळे डॉ. तात्याराव लहाने पुन्हा चर्चेत आहेत. डॉ. तात्याराव लहाने यांनी जे. जे. रूग्णालय परिसरात एक बाग तयार केली आहे. या बागेतील तळ्यात असलेल्या एका बदकाला दिसत नाही हे तात्याराव लहाने यांच्या लक्षात आलं. त्यामुळे त्यांनी त्याच्यावर औषधोपचार केले.
ADVERTISEMENT
काय म्हणाले डॉ. तात्याराव लहाने?
जे. जे. रूग्णालयातील नेत्रचिकित्सा विभागाला जोडून दहा हजार चौरस फुटांची जागा आहे. तिथे कचरा असायचा. मात्र ती जागा आम्ही स्वच्छ करून घेतली. या जागेत झेंडू, हरळ यां लागवड करण्यात आली. मात्र तो प्रयोग यशस्वी झाला नाही. त्यानंतर आम्ही या ठिकाणी सूर्यफुलांची शेती केली. ही शेती चांगली बहरली. दरवर्षी मी वेगवेगळे प्रयोग करत असतो. या बागेत जास्वंदीपासून वेगवेगळी फुलझाडे फुलली आहेत. लिंबाचं आणि चिकूचं झाड लावलं आहे. या बागेत एक छोटं तळं बनवण्याची कल्पना डॉ. पारेख यांनी मांडली. छान हिरवळ त्यात स्वच्छ तळं आणि त्यात विहारणारी बदकं असं चित्र इथे निर्माण झालं.
डॉ. पारेख या ठिकाणी आल्या त्यावेळी त्यांना एक बदकाला नीट दिसत नसल्याचं लक्षात आलं. कारण हे बदक पिंजऱ्यात जाताना त्याची जी धडपड होती त्यामुळे त्याची दृष्टी गेली असावी असं डॉ. पारेख यांना वाटलं. त्यानंतर डॉ. पारेख आणि डॉ. तात्याराव लहाने या दोघांनीही या बदकाच्या डोळ्याची तपासणी केली तेव्हा त्याच्या डोळ्यांना अल्सर झाल्याचं त्यांना लक्षात आलं. मी जेव्हा त्याच्यावर करण्यात येणाऱ्या औषधांची माहिती घेतली त्यानंतर त्याच्यावर औषधोपचार सुरू केले. त्याच्या डोळ्यात आम्ही औषधाचे थेंब टाकण्यास सुरूवात केली. ज्याचा परिणाम काही दिवसांमध्ये आम्हाला दिसून आला. आजही त्याच्या डोळ्यात टिका आहे, त्यामुळे त्याला थोडे तिरके पाहून दिसते. पण आता ते बदक छोट्या तळ्यात छान मस्ती करतं असं तात्याराव लहाने यांनी सांगितलं. लोकसत्ताचे संदीप आचार्य यांच्याशी ही चर्चा डॉ. तात्याराव लहाने यांनी केली आहे.
मागील तीन दशकात डॉ. लहाने व डॉ. रागिणी पारेख यांनी जे.जे. रुग्णालयात तब्बल साडेतीन लाख शस्त्रक्रिया केल्या आहेत. यातील एक लाख 62 हजार शस्त्रक्रिया या डॉ. लहाने यांनी तर 75 हजाराहून जास्त शस्त्रक्रिया डॉ. पारेख यांनी केल्या आहेत.
ADVERTISEMENT