ज्ञानेश्वर पाटील, प्रतिनिधी
ADVERTISEMENT
हिंगोली: हिंगोलीत झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांच मोठं नुकसान झालं अशात प्रशासनाकडून नुकसान ग्रस्त भागाचे पंचनामे करण्यात आले. मात्र, अनेक भाग अतिवृष्टीमधून वगळण्यात आल्याने शेतकऱ्यांमधून नव्या सरकार विरोधात संताप व्यक्त केला जात आहे. सेनगाव तालुक्यातील ताकतोडा येथील नामदेव पतंगे या शेतकऱ्याने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना रक्तान पत्र लिहून आम्ही बिहारमध्ये राहतो का..? असा सवाल उपस्थित करत, आपली व्यथा मांडली आहे.
शेतकऱ्यानं आपल्या पत्रात काय लिहिले आहे?
तालुक्यात खरीपाच्या पेरणी नंतर, अतिवृष्टी झाली. नदी नाल्यांना आलेल्या पुरानं पाणी शेतात जाऊन मोठं नुकसान झालं. बळीराजा देशोधडीला लागला असतांना नव्या सरकारनं पंचनामे केले नंतर मदत मिळेल अशी अपेक्षा होती. मात्र आपण काही मंडळं वगळली यामुळे शेतकऱ्यांची मोठी निराशा झाली आहे.
साहेब आपण अधिवेशनादरम्यान म्हणाला होतात कि शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडणार नाही मग हे काय आहे, मग आम्ही महाराष्ट्रात ऐवजी बिहार मध्ये राहतो का…? साहेब, खाजगी फायनान्स कंपन्यांनी नाकी नौ आणलेत. आम्ही जगायचं कसं.. सांगा? अन्यथा अंगात राहिलेल्या रक्तानं अभिषेक करून जिव सोडून देतो.. अनुदान द्या…अशी मागणी शेतकऱ्यांनं मुख्यमंत्र्यांना केली आहे. आता यावर मुख्यमंत्री काय निर्णय घेतात हे पाहावं लागणार आहे.
महाराष्ट्रात मागच्या काही दिवसांपासून मुसळधार पाऊस सुरु आहे. राज्यात अचानक आलेल्या पावसामुळे शेतकऱ्यांसह सर्वांची दाणादाण उडाली. पहिल्या टप्प्यातही मराठवाड्यात पाऊस झाला होता. त्यामुळे सरकारनं मदत जाहीर केली होती. परंतु अजूनही ती मदत अनेकांना मिळालेली नाही. काहींची नावं यादीतून वगळण्यात आली आहेत. त्यामुळे शेतकरी आता आक्रमक झाला आहे.
ADVERTISEMENT