मी मुख्यमंत्री असताना कोल्हापूरमध्ये पूर आला होता तेव्हा आम्ही पूरग्रस्तांचं कर्ज माफ केलं होतं. त्याप्रमाणेच आताच्या सरकारनेही निर्णय घ्यायला हवा आहे. नियमित कर्ज भरणाऱ्यांना पूरग्रस्तांना सरकार ५० हजार देणार होतं त्याचं काय झालं असा प्रश्नही देवेंद्र फडणवीस यांनी कोल्हापूरमध्ये विचारला आहे. यावेळी मी पॅकेज सीएम नाही असं वक्तव्य जे मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी केलं त्याबद्दलही त्यांना प्रश्न विचारण्यात आला. त्यावेळी देवेंद्र फडणवीस म्हणाले पॅकेज, मदत, दिलासा मुख्यमंत्र्यांनी काहीही म्हणूदे त्याने काही फरक पडत नाही. पूरग्रस्तांना लवकरात लवकर मदत मिळणं आवश्यक आहे.
ADVERTISEMENT
कोल्हापूरमध्ये देवेंद्र फडणवीस यांनी पूरस्थितीची पाहणी केल्यानंतर पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी कोल्हापूर आणि सांगलीत 2015पासून आलेल्या पावसाचा आढावा घेतला. नुकसानीचा आढावा घेण्यासाठी प्रवीण दरेकर आणि मी तीन दिवसांचा दौरा केला. या दौऱ्यात चंद्रकांत पाटीलही जॉईन झाले. तीन जिल्ह्यात 22 ठिकाणी आम्ही भेट देऊन संवाद साधला. दरड कोसळली, भूस्खलन झालं, घरांमध्ये पाणी गेलं अशा वेगवेगळ्या ठिकाणी गेलो. सामान्य माणसांच्या हालअपेष्टा अडचणी समजून घेतल्या, असं फडणवीस यांनी स्पष्ट केलं.
सांगली, कोल्हापुराच्या बाबतीत विशेष अभ्यास करावा लागेल. 2005 ला महापूर बघितला होता. त्यावेळी कोल्हापूर जिल्ह्यात 159 टक्के पाऊस झाला होता. 2019 ला भयानक सरासरीपेक्षा 480 टक्के पाऊस 9 दिवसात झाला होता. यावर्षी सरासरीच्या 50 टक्के पाऊस पाच दिवसात झाला. सांगलीत 21 दिवसात 221 टक्के पाऊस जास्त झाला. पाऊस खूप मोठ्या प्रमाणात नाही. अलमट्टी धरणातून विसर्गही सुरु आहे. राधानगरीतून तेवढ्या मोठ्या प्रमाणात विसर्ग नाही. जी उच्चपूर रेषा आहे, ती 2019 च्याही वर आहे. त्यामुळे अतिशय गांभीर्याने या पुराकडे पाहावं लागेल. एवढा मोठा पाऊस न होता, विसर्ग न होता पाणी का साठलं यावर उपाय शोधावे लागतील. कोल्हापुरात 396 गावं बाधित, 2 लाखांहून अधिक लोकांचं स्थलांतर, 60 हजारपेक्षा जास्त क्षेत्र बाधित झालं. प्रशासकीय इमारती, शाळांचं नुकसान. घरांचं, दुकानांचं मोठं नुकसान झालं आहे, असं ते म्हणाले.
आत्ता पुरामुळे जे नुकसान झालं आहे ते पाहता राज्य सरकारने तातडीची मदत करायला हवी होती मात्र ती अद्याप केलेली नाही. आमच्या सरकारने ती केली होती. लोकांना जेव्हा मी भेटलो तेव्हा लोकांनीही मला 2019 ला तुम्ही मुख्यमंत्री असताना कशी मदत केली होती त्याची आठवण करून दिली. जेव्हा कोणतंही संकट येतं तेव्हा त्यातून सावरण्यासाठी काळ महत्त्वाचा असतो. त्या काळावधीत रिस्टोरेशन करावं लागतं आणि तातडीची मदत देणं आवश्यक असतं. घर, दुकानं यामध्ये चिखल जातो, गाळ होतो. या सगळ्या सफाईचाही खर्च बराच असतो. घरातले अनेक जिन्नस जसं की मीठापासून डाळीपर्यंत, धान्यापर्यंत सगळे पदार्थ खराब झालेले असतात. पाऊस आणि पूर असं दुहेरी संकट सहन करणाऱ्या लोकांना गरज असते ती तातडीच्या मदतीची ती या सरकारने तातडीने करावी अशीही मागणी यावेळी फडणवीस यांनी केली.
ADVERTISEMENT