केंद्रीय मंत्री स्मृती इराणी ‘द कपिल शर्मा’ शोच्या निर्मात्यांवर नाराज असल्याच्या चर्चांना उधाण आलं आहे. अलीकडेच, केंद्रीय मंत्री स्मृती इराणी त्यांच्या ‘लाल सलाम’ या पुस्तकाच्या प्रमोशनसाठी शोमध्ये येणार असल्याची चर्चा होती. मात्र, आता त्यांचा हा एपिसोड काही काळासाठी रद्द करण्यात आला आहे. जेव्हा स्मृती इराणी या स्टुडीओच्या गेटवर पोहोचल्या तेव्हा गेटकीपरला त्यांना ओळखता आले नाही, असे सांगितले जात आहे.
ADVERTISEMENT
स्मृती इराणी सेटवर पोहोचल्या असता, तेथील गार्डने त्यांच्या ड्रायव्हरला थांबवून गाडी आत सोडण्यास नकार दिला. या दरम्यान ड्रायव्हर आणि गेटकीपरमध्ये बरीच वादावादी देखील झाली. परंतु, यातून काही निष्पन्न झाले नाही. यानंतर वैतागलेल्या स्मृती इराणी शूटिंग न करताच दिल्लीला परतल्या.
स्मृती इराणी मुंबईतील ‘द कपिल शर्मा शो’च्या सेटवर पोहोचल्या होत्या, पण तिथे उभ्या असलेल्या खाजगी सुरक्षा रक्षकाने त्यांना आत जाऊ देण्यास नकार दिला. स्मृती इराणी यांनी गार्डला समजवण्याचा खूप प्रयत्न केला आणि सांगितले की, त्या शोमध्ये पाहुण्या म्हणून आल्या आहेत आणि त्या केंद्रीय मंत्री देखील आहे. मात्र, सुरक्षारक्षक हे मान्य करायला तयार नव्हते. असे मोठे नेते कधीच एकटे फिरत नाहीत, त्यांच्यासोबत सुरक्षा कर्मचारी आणि पोलिस फौज असते, असे तो गार्ड म्हणाला. एका सामान्य महिलेप्रमाणे शोमध्ये पोहोचलेल्या स्मृती यांना गार्डने आत प्रवेश देण्यास स्पष्टपणे नकार दिला.
कपिल शर्माच्या शोमध्ये अनेक सेलिब्रिटी त्यांच्या चित्रपटांच्या प्रमोशनसाठी येत असतात. आगामी एपिसोडमध्ये अभिनेत्री आणि केंद्रीय मंत्री स्मृती इराणी त्यांच्या ‘लाल सलाम’ या पुस्तकाच्या प्रमोशनसाठी आल्या होत्या. मात्र, त्यांना प्रवेश नाकारला गेल्याने आता हे शूट रद्द करावे लागले आहे.
तब्बल अर्धा तास स्मृती इराणी यांना या सेट बाहेर ताटकळत उभे राहावे लागले होते. मात्र, नंतर त्या तिथून दिल्लीला रवाना झाल्या. या शोचा सूत्रसंचालक आणि प्रसिद्ध कॉमेडियन कपिल शर्मा याला सादर प्रकार कळताच त्याने गार्डला फटकारले. नंतर, कपिल शर्माने संपूर्ण परिस्थिती स्मृती इराणींना सांगून, त्यांची माफी देखील मागितली आहे. मात्र, आता त्या पुन्हा या शोमध्ये सहभागी होणार की नाही अद्याप अस्पष्ट आहे.
ADVERTISEMENT