महाविकास आघाडी सरकार म्हणजे तीन चाकांची रिक्षा आहे. त्या रिक्षेची तीन चाकं तीन दिशेला जाणारी आहेत असं मी मागे म्हटलं होतं. त्यात मी आज थोडासा बदल करतो, महाविकास आघाडी सरकार म्हणजे तीन चाकांची रिक्षा आहे. या सरकारची चाकं तीन दिशेला आहेत. मात्र तिन्ही चाकं पंक्चर आहेत. ही रिक्षा पुढे जातच नाही फक्त धूर निघतो असं म्हणत केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी महाविकास आघाडी सरकारवर टीकेची तोफ डागली आहे.
ADVERTISEMENT
महाराष्ट्र दौऱ्यात अमित शाह यांचा नाव न घेता पवारांना सल्ला
2019 च्या विधानसभा निवडणुकीच्या वेळी मी आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हे स्पष्ट सांगितलं होतं की 2019 च्या विधानसभा निवडणुकीनंतर देवेंद्र फडणवीस हेच मुख्यमंत्री होतील. शिवसेनेने मात्र आमच्यासोबत विश्वासघात केला. सत्ता मिळवायची होती म्हणून काँग्रेसच्या मांडीवर जाऊन बसले. मी आज पुन्हा सांगतो आहे की त्यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस होतील हेच ठरलं होतं. जे उद्धव ठाकरे मला खोटं ठरवतात त्यांनी एकदा प्रचार सभा काढून बघा. त्यात तुमचा फोटो केवढा होता बघा आणि बाकीचे फोटो बघा. मला खोटं ठरवण्याच्या आधी जरा आत्मपरीक्षण करून बघा.
नेमकं काय म्हटलं आहे अमित शाह यांनी?
‘मी 2019 च्या विधानसभा निवडणुकीच्या वेळी महाराष्ट्रात आलो होतो. त्यावेळी शिवसेनेबाबत जो संवाद झाला तो मी केला आहे. मी आज पु्न्हा एकदा हे सांगू इच्छितो त्यावेळी हे ठरलं होतं की देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात निवडणूक लढली जाईल आणि मुख्यमंत्री भाजपचा होईल. मात्र शिवसेनेने शब्द फिरवला. सत्तेसाठी हिंदुत्वाशी तडजोड केली. दोन पिढ्यांपासून ज्यांच्याशी लढत होतात, सत्तेसाठी त्यांच्या मांडीवर शिवसेना बसली.’
‘त्यानंतर आम्हाला खोटं ठरवलं. उद्धव ठाकरे म्हणतात की मी खोटं बोलतोय, चला आपण एक सेकंदासाठी मानू. पण उद्धवभाऊ तुमच्या सभेच्या मागे जे बॅनर होते ते तुम्ही कधी पाहिले का? मोदींचा फोटो केवढा होता आणि तुमचा केवढा होता पाहिला का? तुम्हाला तुमच्या प्रत्येक भाषणात मोदींचं नाव घ्यावं लागत होतं. तुम्हाला मी आणि नरेंद्र मोदींनी सांगितलं होतं की देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री होतील. मात्र त्यांना मुख्यमंत्री व्हायचं होतं म्हणून विश्वासघात केला. सत्तेवर बसलात आणि काय केलं? मी काही दिवसांपूर्वी आलो होतो तेव्हा म्हटलं होतं महाविकास आघाडी सरकार रिक्षासारखं आहे. तीन पक्ष म्हणजे तीन चाकं आहेत त्यांच्या दिशा तीन दिशेला जातात. मात्र मी थोडं चुकलो होतो तेव्हा ती चूक आज सुधारतो. महाविकास आघाडी म्हणजे तीन चाकांची पंक्चर रिक्षा आहे. त्याची चाकं पुढे जातच नाहीत फक्त धूर निघतो. असं म्हणत अमित शाह यांनी महाविकास आघाडीला सुनावलं आहे.’
ADVERTISEMENT