पुण्यात एका मांत्रिकाने महिलेला मुलगा व्हावा म्हणून धबधब्याखाली आंघोळ करण्यास भाग पाडलं. या प्रकरणात त्या मांत्रिकाला महिलेच्या पतीने आणि सासरच्या मंडळींनीही मदत केली. या प्रकरणी कौटुंबिक हिंसाचार, जादूटोणा प्रतिबंधात्मक कायदा आणि आर्थिक फसवणूक प्रकरणात चौघांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.
ADVERTISEMENT
नेमकी काय घडली पुण्यातली धक्कादायक घटना?
तुमच्या सुनेला मुलगा होईल, तुमच्या घरात भरभराट होईल यासाठी तुमच्या पत्नीला धबधब्याखाली आंघोळ करावी लागेल असं मांत्रिकाने एका महिलेच्या पतीला सांगितलं. त्यानुसार या महिलेला मांत्रिकाने, तिच्या पतीने आणि सासरच्या मंडळींनी धबधब्याखाली आंघोळ करण्यास भाग पाडलं. असा आरोप या मांत्रिकावर आहे. तसंच पीडित महिलेची तिच्या पतीने कोट्यवधींना फसवणूक केल्याचाही आरोप आहे. या प्रकरणात पुण्यातल्या भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात पीडित महिलेचा पती, सासू, सासरे आणि मांत्रिक अशा चौघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी नेमकी काय माहिती दिली आहे या प्रकरणाबाबत?
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कात्रज येथील आंबेगाव परिसरात राहणाऱ्या महिलेचा २०१३ मध्ये विवाह झाला होता. त्यानंतर काही महिन्यापासून पती, सासू, सासऱ्यांनी छळ करण्यास सुरुवात केली. तर त्याच दरम्यान पीडित महिलेच्या आई वडिलांनी हिरेजडीत सोन्याचे दागिने विश्वासाने या महिलेच्या पतीकडे दिले होते. त्यानंतर आरोपी पतीने हिरेजडीत सोन्याचे दागिने विकून पैसे मिळवले आणि सदनिकेची कागदपत्रं गहाण ठेवून 75 लाख रुपयांचं कर्ज काढले. पीडित महिलेची आरोपी पती याने जवळपास 2 कोटी पर्यन्त आर्थिक फसवणूक देखील केली आहे असाही आरोप आहे.
या सर्व घटना घडत असताना.पीडित महिलेच्या पतीची एका मांत्रिका सोबत ओळख झाली. त्यावेळी त्या मांत्रिकाने सांगितले की तुला मुलगा व्हावा असे वाटत असेल, भरभराट हवी असेल तर तुझ्या पत्नीला धबधब्याखाली आंघोळ करावी लागेल. त्यानंतर आरोपी पती याने पत्नीला कुटुंबिय आणि मांत्रिकाला घेऊन रायगड येथे घेऊन गेला. तिथे एका धबधब्या खाली सर्वांसमोर आंघोळ करण्यास भाग पाडले. त्यानंतर पूजा देखील करण्यात आली. प्रकरण एवढ्यावरच थांबलं नाही.
यापुढे जाण्यास विरोध दर्शवल्यानंतर पीडित महिलेला शिवीगाळ आणि मारहाणही करण्यात आली.वेळोवेळी होणार्या त्रासाला कंटाळून अखेर भारती विद्यापीठ पोलिस स्टेशनमध्ये तक्रार देताच पती,पत्नी, सासू,सासरे आणि मांत्रिक या चौघांविरोधात कौटुंबिक हिंसाचार,जादू टोणा प्रतिबंधात्मक कायद्यानुसार, आर्थिक फसवणूक या कलमान्वये भारती विद्यापीठ पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या सर्व आरोपीचा शोध घेतला जात असल्याचे सांगण्यात आलं आहे.
ADVERTISEMENT