मुंबईत दिवसभरात ५ हजार पेक्षा जास्त रूग्ण पॉझिटिव्ह आढळले आहेत. कोरोनाची साथ सुरू झाल्यापासून कोरोना रूग्णांची मुंबईतली ही सर्वाधिक संख्या आहे. आज दिवसभरात मुंबईत कोरोनाचे ५ हजार १८५ नवे रूग्ण पॉझिटिव्ह आढळले आहेत. तर दिवसभरात २ हजार ८८ रूग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. आजपर्यंत मुंबईत कोरोनाचे एकूण ३ लाख ७४ हजार ६११ रूग्ण आढळले आहेत. यापैकी ३ लाख ३१ हजार ३२२ रूग्ण बरे झाले आहेत. मुंबईत दिवसभरात कोरोनामुळे ६ रूग्णांचा मृत्यू झाल्याची नोंद आहे. तर आत्तापर्यंत मुंबईत एकूण ११ हजार ६०६ रूग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.
ADVERTISEMENT
आमिर खानच्या संपर्कात आल्याने मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनाही करावी लागणार कोरोना टेस्ट
महापालिका प्रशासनाने उचलली कठोर पावलं
मुंबईत वाढत्या कोरोना रुग्णसंख्येवर नियंत्रण ठेवण्यासाठी महापालिका प्रशासनाने आता कठोर पावलं उचलण्यास सुरुवात केली आहे. शहरात गर्दी होणाऱ्या ठिकाणी म्हणजेच मॉल, रेल्वे स्टेशन (बाहेरुन मुंबईत येणाऱ्या ट्रेन), MSRTC बस डेपो, खाऊ गल्ली, फेरीवाल्यांची ठिकाणं, बाजारपेठा, पर्यटनाची ठिकाणं आणि विविध सरकारी रुग्णालयात अचानक रॅपिड अँटिजेन टेस्ट केली जाणार आहे. ही टेस्ट करुन घेण्यासाठी कोणत्याही नागरिकाने सहकार्य केलं नाही तर त्याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात येईल.
मुंबई महापालिकेकडून नवीन नियम लागू करण्यात आले आहेत, काय आहेत हे नियम जाणून घ्या…
१) शहरातील प्रत्येक मॉलमध्ये किमान ४०० रॅपिट अँटिजेन टेस्ट केल्या जातील.
२) बाहेरुन मुंबईत येणाऱ्या रेल्वे गाड्यांमधून येणाऱ्या प्रवाशांचीही अचानक रॅपिड अँटीजेन टेस्ट केली जाईल. यासाठी रोजचं लक्ष्य हे किमान १ हजार प्रवासी एवढं असेल.
३) हाच निकष MSRTC च्या बस डेपोवरही लावला जाणार आहे.
४) मुंबईतील प्रत्येक वॉर्डात गर्दी होणाऱ्या ठिकाणांवर किमान १ हजार चाचण्या करण्याचं उद्दीष्ठ. याव्यतिरीक्त हॉटेल-रेस्टॉरंट, खाऊ गल्ली, फेरीवाल्यांची ठिकाणं, बाजारपेठा, पर्यटनाची ठिकाणं इथेही अचानक अँटीजेन टेस्ट करण्यात येणार आहे.
५) मॉलमध्ये फिरायला किंवा खरेदी करण्यासाठी येणाऱ्या लोकांकडून रॅपिड अँटीजेन टेस्टचा खर्च वसूल करण्यात येईल. एखाद्या व्यक्तीने स्वतःची चाचणी करवून घ्यायला आणि पैसे देण्यास नकार दिला तर त्याच्याविरोधात गुन्ह्याची नोंद करण्यात येईल.
६) याव्यतिरीक्त इतर गर्दीच्या ठिकाणी करण्यात येणाऱ्या रॅपिड अँटीजेन टेस्टचा खर्च हा महापालिका करणार आहे.
ADVERTISEMENT