शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांच्या पत्राने संपूर्ण राज्यात चर्चांना उधाण आलं आहे. सरनाईक यांच्या पत्रानंतर राज्यात पुन्हा सेना-भाजप युतीची चर्चा सुरु झाली आहे. या रणधुमाळीत आणखी एका नेत्याने उद्धव ठाकरेंना शिवसेनेच्या भवितव्याचा विचार करुन भाजपशी युती करण्याचा सल्ला दिला आहे.
ADVERTISEMENT
रिपाइ नेते रामदास आठवले यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरुन एक व्हिडीओ प्रसारित करत सरनाईकांच्या मागणीला पाठींबा दर्शवला आहे. “शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांच्या मताला माझा पाठींबा आहे. शिवसेनेने भाजपसोबत युती करावी हे मी आधीपासून सांगत आलोय. शिवसेनेच्या भवितव्याचा आणि महाराष्ट्राच्या हिताचा विचार करुन उद्धव ठाकरेंनी भाजपशी युती करावी”, असं आठवलेंनी म्हटलं आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेससोबत जुळवून घेणं मुख्यमंत्र्यांना कठीण जात असल्याचंही आठवले म्हणाले. काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या चक्रात उद्धव ठाकरे अडकत चालले आहेत, त्यामुळे त्यांना काम करणं अवघड जातंय. शिवसेना आणि भाजप नेत्यांचे आजही एकमेकांशी आपुलकीचं नात आहे. त्यामुळे भाजपशी युती करण्यास शिवसेनेला अडचण येणार नाही अशी सरनाईक यांची सूचना योग्य आहे असं आठवलेंनी म्हटलंय.
रामदास आठवलेंनी सांगितला युतीचा फॉर्म्युला –
शिवसेनेने पुन्हा एकदा भाजपसोबत युती केल्यानंतर फॉर्म्युला आठवलेंनी सांगितला आहे. “शिवसेनेने पुन्हा भाजपसोबत युती करुन राज्यात अडीच वर्षासाठी मुख्यमंत्रीपद वाटून घ्यावं. अडीच वर्ष देवेंद्र फडणवीसांना द्यावं तर अडीच वर्ष मुख्यमंत्रीपद शिवसेनेने घ्यावं. यातचं महाराष्ट्राचं आणि दोन्ही पक्षांचं भलं आहे”, असंही आठवले म्हणाले.
ADVERTISEMENT