मुंबईसह देशातील अनेक महानगरांमध्ये गेल्या काही दिवसांपासून कोरोनाच्या ओमिक्रॉन व्हेरिएंटचे रुग्ण सापडत आहेत. कोरोनाच्या रुग्णसंख्येमध्ये झालेली अचानक वाढ पाहता केंद्र सरकारसह सर्व राज्य सरकारनी आपापल्या राज्यात निर्बंध लागू केले आहेत. मुंबईसह महाराष्ट्रात राज्य सरकारने जमावबंदी लागू केली आहे. परंतू गेल्या काही दिवसांमधील रुग्णसंख्येतली वाढ पाहता पुन्हा लॉकडाउन लावलं जाण्याबद्दल चर्चांना उधाण आलं आहे.
ADVERTISEMENT
महाराष्ट्राच्या टास्क फोर्समधील महत्वाचे सदस्य डॉ. राहुल पंडीत यांनी मुंबई तक शी बोलताना मुंबई आणि दिल्लीत कोरोनाची तिसरी लाट आलेली असल्याचं सांगितलं. रुग्णवाढीचे हे आकडे चिंताजनक असल्याचंही अनेक तज्ज्ञांनी बोलून दाखवलं आहे. “सध्याच्या घडीला मुंबई आणि दिल्ली शहरात रुग्णांमध्ये होणारी वाढ पाहता कोरोनाची तिसरी लाट शहरात दाखल झाली आहे असं म्हणायला नक्कीच वाव आहे.”
Covid 19: महाराष्ट्रात कठोर निर्बंध लागणार का? अजित पवारांनी दिलं उत्तर, म्हणाले…
सध्याच्या घडीला रुग्णसंख्येत होणारी वाढ पाहता हे रुग्ण ओमिक्रॉनचे असल्याचं म्हणता येईल. परंतू आपण सध्याच्या घडीला जिनॉस सिक्वेन्सिंगचा अहवाल आल्यानंतरच या निष्कर्षापर्यंत येत आहोत. सध्याच्या घडीला जे रुग्ण सापडत आहेत त्यांच्या डेल्टा आणि ओमिक्रॉनचं मिश्रण असल्याचं चित्र दिसत आहे. येत्या १० दिवसांमध्ये हॉस्पिटलमध्ये दाखल होणाऱ्या रुग्णांवरुन आपल्याला सध्याच्या परिस्थितीचा अधिक स्पष्ट अंदाज येईल अशी माहिती डॉ. राहुल पंडीत यांनी दिली.
Covid 19: मुंबईकरांना न्यू इयर पार्टी करता येणार नाही, मुंबईत 144 कलम लागू
महाराष्ट्रासह अनेक राज्यांमध्ये होणारी गर्दी पाहता निर्बंध लागू करण्यात आले आहेत. संपूर्ण राज्याचं हेल्थ इन्फ्रास्ट्रक्चर लक्षात घेता हा निर्णय त्या-त्या राज्यांनी घेतला असून तो योग्यच असल्याचं डॉ. पंडीत म्हणाले. “एक डॉक्टर म्हणून मी हाच सल्ला देईन की लोकांनी नियमांचं काटेकोरपणे पालन करावं आणि जर तुम्हाला लक्षण दिसून येत असतील तर स्वतःची चाचणी करुन घ्यावी. आरोग्य यंत्रणेवर जास्त प्रमाणात ताण येतो आहे असं सरकारला ज्यावेळेला वाटेल तेव्हाच लॉकडाउन जाहीर होईल. तोपर्यंत याची गरज वाटत नाही. लोकांनी नियमांचं पालन केलं आणि सार्वजनिक जागांवर मास्क घातला तरीही पुरेसं आहे.”
मुंबईत २९ तारखेला कोरोनाचे २५१० नवीन रुग्ण सापडले आहेत. सध्याच्या घडीला मुंबईतील ४५ इमारती महापालिकेने सिल केल्या आहेत. तसेच मुंबईत ओमिक्रॉनची लागण झालेल्या रुग्णांची संख्या आता १३७ वर पोहचली आहे. ज्यामुळे मुंबईत नवीन वर्षाच्या पार्टीला परवानगी नाकारण्यात आली आहे. अनेकांनी राज्य सरकारच्या रात्री ९ ते सकाळी ६ वाजल्याच्या काळात जमावबंदीच्या निर्णयावर प्रश्नचिन्ह निर्माण केलं होतं. परंतू राहुल पंडीत यांनी हा निर्णय योग्य असल्याचं सांगत यामाध्यमातून लोकांनी परिस्थिती गांभीर्याने घ्यावी हा संदेश योग्य पद्धतीने जातो असं सांगितलं.
ADVERTISEMENT