Omicron threat: कोरोनाचा सर्वात संसर्गजन्य व्हेरिएंट Omicron चे रुग्ण आता भारतात वाढू लागले आहेत. हे पाहता देशात कोरोनाची तिसरी लाट येण्याची शक्यताही व्यक्त केली जात आहे. ओमिक्रॉनचा पहिला रुग्ण हा दक्षिण आफ्रिकेत आढळून आला होता. यानंतर, हा व्हेरिएंट आता सुमारे 100 देशांमध्ये पसरला आहे. बहुतेक युरोपियन देशांमध्ये कोरोनाच्या रुग्णांमध्ये अचानक वाढ झाली आहे आणि यापैकी बहुतेक रुग्ण हे ओमिक्रॉन व्हेरिएंटचे आहेत.
ADVERTISEMENT
भारतात आतापर्यंत Omicron चे 236 रुग्ण सापडले आहेत. आता हा आकडा दररोज वाढू लागला आहे. केंद्राने राज्यांना सावध करताना सांगितले आहे की, ओमिक्रॉन डेल्टापेक्षा जवळजवळ तिप्पट वेगाने पसरतो. त्याचा संक्रमण दर पाहून सरकार सतर्क झालं आहे. काही राज्यांमध्ये नवीन वर्षाच्या सेलिब्रेशनवर देखील कठोर निर्बंध लागू करण्यात आले आहेत. ओमिक्रॉनची वाढती रुग्ण संख्या पाहता देशात आता तिसरी लाट येण्याची शक्यताही आरोग्य तज्ज्ञांकडून वर्तवण्यात येत आहे.
वर्षाच्या सुरुवातीला तिसरी लाट येण्याची शक्यता आहे
राष्ट्रीय कोव्हिड-19 सुपरमॉडेल समितीचे सदस्य विद्यासागर यांनी एएनआयला सांगितले की, ‘पुढील वर्षाच्या सुरुवातीला भारतात तिसरी लाट येण्याची शक्यता आहे. तथापि, लोकांमध्ये मोठ्या प्रमाणावर प्रतिकारशक्ती निर्माण झाल्यामुळे ती दुसऱ्या लाटेपेक्षा काहीशी कमकुवत असेल, परंतु तिसरी लाट नक्कीच येईल.’
‘एप्रिल-मेमध्ये दुसऱ्या लाटेतील रुग्णांच्या तुलनेत तिसऱ्या लाटेत त्याची संख्या कमी असेल. सरकारने 1 मार्चपासून भारतात लसीकरण सुरू केले होते. डेल्टा व्हेरिएंट देखील याच वेळेस भारतात आला होता. त्यावेळी फ्रंटलाईन वर्कर्स वगळता कोणालाही लस देण्यात आली नव्हती. त्यामुळेच डेल्टाने मोठ्या प्रमाणात लोकांना संक्रमित केलं होतं.’
विद्यासागर म्हणाले, ‘आता देशात 75 ते 80 टक्के सीरो-प्रेवलेन्स आहे. 85% लोकांना पहिला डोस मिळाला आहे आणि 55% लोकांना लसीचे दोन्ही डोस मिळाले आहेत. जे या साथरोगापासून 95% संरक्षण करते. त्यामुळे तिसऱ्या लाटेत तेवढ्या प्रमाणात रुग्ण समोर येणार नाहीत जेवढे दुसऱ्या लाटेत पाहायला मिळाले होते. तसेच दुसऱ्या लाटेच्या अनुभवातून आपण आपली क्षमताही निर्माण केली आहे. त्यामुळे आम्ही कोणत्याही अडचणीशिवाय त्याचा सामना करू शकतो.’
‘दररोज 2 लाख नवे रुग्ण सापडू शकतात’
हैदराबादमधील आयआयटीचे प्राध्यापक विद्यासागर म्हणाले की, ‘रुग्णांची संख्या ही दोन गोष्टींवर अवलंबून असेल. पहिली गोष्ट म्हणजे डेल्टामधून मिळालेली नैसर्गिक प्रतिकारशक्तीला ओमिक्रॉन किती बायपास करते आणि दुसरी गोष्ट लसीपासून मिळालेल्या प्रतिकारशक्तीला ओमिक्रॉन चकमा देऊ शकतो. या दोन गोष्टींवर तिसरी लाट अवलंबून असणार आहे.’
‘सध्या या दोनही गोष्टींबाबत संपूर्ण माहिती उपलब्ध नाही. विद्यासागर यांच्या म्हणण्यानुसार, जर देशात तिसरी लाट आली तर सर्वात वाईट परिस्थितीत भारतात दररोज दोन लाखांपेक्षा जास्त केसेस नसतील. तथापि, प्राध्यापकांनी हा केवळ अंदाज आहे, भविष्यवाणी नाही’ असंही स्पष्टपणे सांगितलं.
Covid 19: ब्रिटनमध्ये कोरोनाचा कहर, एका दिवसात सापडले तब्बल 1 लाख नवे रुग्ण; महाराष्ट्रात काय परिस्थिती?
प्राध्यापक विद्यासागर म्हणाले, ‘ओमिक्रॉन विषाणू भारतीय लोकांमध्ये कसा परिणाम करत आहे हे कळल्यानंतर आम्ही अनुमान काढू शकतो. सर्वात वाईट परिस्थितीत, नैसर्गिक किंवा लसीपासून कमी प्रतिकारशक्तीमुळे रुग्णांची संख्या दररोज 1.7 ते 1.8 लाखांच्या खाली राहील. हे दुसऱ्या लाटेच्या पीकच्या निम्म्यापेक्षाही कमी आहे.’
ADVERTISEMENT