पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या केंद्रीय मंत्रीमंडळाचा विस्तार नुकताच पार पडला. महाराष्ट्रातून ४ खासदारांना यावेळी मंत्रीपदाची लॉटरी लागली. परंतू काही दिवसांपूर्वी मंत्रीपदाच्या शर्यतीत आघाडीवर असलेल्या बीडच्या खासदार डॉ. प्रीतम मुंडे यांचं नाव ऐनवेळी मागे पडलं. प्रीतम यांना डावलून भागवत कराड यांना संधी देण्यात आली. या विस्तारानंतर मुंडे भगिनींमध्ये नाराजी असल्याच्या बातम्या समोर येत होत्या. त्यातच शिवसेनेने भाजपला हाच धागा पकडून डिवचलं आहे.
ADVERTISEMENT
‘सामना’ मधील अग्रलेखातून शिवसेनेने मोदींच्या मंत्रीमंडळ विस्तारावर टीका केली आहे. “डॉ. भागवत कराड हे राज्यमंत्री झाले. पंकजा मुंडे यांना संपूर्ण खतम करायचा हा डाव आहे. कराड हे गोपीनाथ मुंडेंच्या सावलीत वाढले, पण प्रीतम यांचा विचार न करता कराड यांना मंत्रीपद देण्यात आलं. वंजारी समाजात फूट पाडण्यासाठी व पंकजा मुंडे यांना धडा शिकवण्यासाठी हे केलं गेलं की काय अशी शंका घ्यायला वाव आहे.”
कपिल पाटील आणि डॉ. भारती पवार यांना राज्यमंत्रीपद मिळणं म्हणजे महाराष्ट्रातील निष्ठावंत भाजपवाल्यांच्या जखमेवर मीठ चोळण्याचा प्रकार असल्याचंही शिवसेनेने म्हटलं आहे. दरम्यान प्रीतम मुंडे यांचं नाव मंत्रीपदाच्या शर्यतीतून बाहेर पडल्यामुळे त्या नाराज आहेत याबद्दल देवेंद्र फडणवीस यांचा प्रश्न विचारण्यात आला. ज्याला उत्तर देताना फडणवीस यांनी, ‘प्रीतम मुंडे या नाराज आहेत असं कोणी सांगितले? कारण नसताना त्यांना बदनाम करण्याचा प्रयत्न करु नका. भाजपमध्ये सर्वोच्च नेते निर्णय करत असतात. त्यामुळे प्रीतम मुंडे या अजिबात नाराज नाही’, असं उत्तर देत फारशी प्रतिक्रीया देणं टाळलं.
Cabinet Expansion : मंत्रीपद नाकारल्यामुळे प्रीतम मुंडे नाराज? सोशल मीडियावर कार्यकर्त्यांमध्येही नाराजी
ADVERTISEMENT