Blessing Money, साडी आणि नारळ न दिल्याने एका तृतीय पंथीयाने तीन महिन्यांच्या मुलीचं अपहरण केलं त्यानंतर त्या मुलीची हत्या केली आणि मृतदेह नाल्यात फेकून दिला. दक्षिण मुंबईत हा धक्कादायक प्रकार घडला आहे. याप्रकरणी पोलिसांनी एका तृतीयपंथीयासह दोन जणांना अटक केली आहे. या तृतीय पंथीयाने मुलीच्या आई वडिलांकडून 1100 रूपये दक्षिणा, नारळ आणि साडी यांची मागणी केली होती. ते न दिल्याने मुलीचं अपहरण करून तिला ठार करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी या तृतीयपंथीयाच्या अटकेनंतर दिली आहे. दक्षिण मुंबईच्या आंबेडकर नगर भागात असलेल्या वस्तीत ही धक्कादायक घटना घडली आहे.
ADVERTISEMENT
आर्या सचिन चित्तोळे असं या तीन महिन्यांच्या मुलीचं नाव होतं. तिचा मृतदेह पोलिसांना नाल्यात आढळून आला. तिचे आई वडील, आजी आजोबा हे सगळे झोपले असताना या मुलीचं अपहरण करण्यात आलं. आपल्याला पैसे, नारळ आणि साडी न दिल्याच्या रागातून या तृतीय पंथीयाने या मुलीची हत्या केली आणि तिचा मृतदेह नाल्यात फेकून दिला.
या प्रकरणी कफ परेड पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार तृतीयपंथीयाचं नाव कन्हैय्या चौगुले उर्फ कन्नू असे आहे. हा तृतीयपंथीय सचिन चित्तोळेच्या घरी गेला होता. त्यांच्या घरी बाळाचा जन्म झाला आहे कन्नूला कळलं होतं. गुरूवारी रात्री 8 वाजण्याच्या सुमारास कन्नूने चित्तोळे कुटुंबीयांकडे 1100 रूपये दान द्या, साडी आणि नारळ द्या अशी मागणी केली. सचिन चित्तोळेने म्हणजेच आर्याच्या वडिलांनी आणि इतर कुटुंबीयांनी कन्नूला दक्षिणा, साडी आणि नारळ देण्यास नकार दिला. सचिन चित्तोळेची नोकरी लॉकडाऊनमधे सुटली त्यामुळे त्याच्याकडे पैसे नव्हते. तरीही त्याने साडी आणि नारळ कन्नूला देण्याची तयारी दर्शवली. पण कन्नूने ऐकलं नाही. कन्नूने सांगितलं मला 1100 रूपये दक्षिणा, साडी आणि नारळ पाहिजे. त्या दोघांमध्ये यावरून बराच वाद झाला. मग सचिनने कन्नूला घरातून हाकलून दिलं.
कन्नूसोबत घडलेली घटना सोनू काळेला समजली. सोनू आणि कन्नू या दोघांनी मिळून घडलेल्या घटनेचा सूड घेण्याचं ठरवलं. पहाटे 2 च्या सुमारास हे दोघेही सचिन चित्तोळेच्या घरी गेले. त्यांनी शांतपणे घराचा दरवाजा उघडला आणि आर्याला तिथून पळवलं. आर्याला सोबत घेतल्यावर कन्नू आणि सोनू तिथून पळाले. त्यानंतर या दोघांनी मिळून या तीन महिन्यांच्या मुलीची हत्या केली आणि तिचा मृतदेह नाल्यात फेकला.
शुक्रवारी सकाळी जेव्हा चित्तोळे कुटुंबीय उठले तेव्हा त्यांनी पाहिलं आर्या घरात नाही. त्यानंतर त्यांनी कफ परेड पोलीस ठाण्यात आर्या हरवल्याची तक्रार नोंदवली. पोलिसांनीही अज्ञातांच्या विरोधात अपहरणाचा गुन्हा नोंदवला. त्यानंतर सचिन चित्तोळेने कन्नूसोबत गुरूवारी रात्री घडलेला वादही पोलिसांना सांगितला. ज्यानंतर आम्ही कन्नूला ताब्यात घेतलं आणि कसून चौकशी केली. ज्यानंतर कन्नूने आणि सोनूने गुन्ह्याची कबुली दिली असंही पोलिसांनी म्हटलं आहे. डीसीपी चैतन्य मुंबई पोलिसांचे प्रवक्ते यांनी ही माहिती दिली आहे. आता त्या बाळाचा मृतदेह जे. जे. रूग्णलायात पोस्टमॉर्टमसाठी पाठवण्यात आला आहे.
ADVERTISEMENT