हवामाने विभागाने व्यक्त केलेल्या अंदाजाप्रमाणे राज्यातील काही भागात मुसळधार पावसासह गारपीट झाली. मराठवाड्यातील औरंगाबाद, विदर्भातील वाशिम, तर मध्य महाराष्ट्रातील अहमदनगर जिल्ह्यात गारपिटीसह पाऊस झाला. यामुळे शेतकऱ्यांच्या द्राक्ष, कांदा, गहू, हरभरा पिकांना फटका बसला असून, मोठं नुकसान झालं असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.
ADVERTISEMENT
वातावरणातील बदलामुळे महाराष्ट्रासह मध्य प्रदेश, छत्तीसगढ झारखंड राज्यांमध्ये 28 ते 30 डिसेंबर दरम्यान गारपिटीसह मध्यम पावसाचा इशारा हवामान विभागाकडून व्यक्त करण्यात आलेला आहे. दरम्यान, राज्यातील काही भागात आज मुसळधार पावसासह गारपीट झाली.
अहमदनगर जिल्ह्यातील श्रीरामपूर, नेवासा तालुक्यात जोराच्या गारांसह पाऊस झाला. गोदावरी नदीच्या काठावरील गावांना याचा फटका बसल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. गारपीट आणि वादळी पावसामुळे द्राक्ष, कांदा, गहू हरबरा पिकांना फटका बसला असून, अचानक झालेल्या गारपीटीने शेतकरी हवालदिल झाला आहे.
मराठवाड्यातील औरंगाबाद आणि जालना जिल्ह्यात गारपिटीसह पाऊस होणार असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आलेला होता. औरंगाबाद जिल्ह्यातील विविध भागात गारांसह पावसाने हजेरी लावली. औरंगाबाद जिल्ह्यातील वैजापूर तालुक्यातील काही गावांमध्ये जोरदार गारपीट झाली. टपोऱ्या गारांच्या माऱ्याने अनेक ठिकाणी गहू हरभऱ्यासह फळबागाचं नुकसान झाल्याची प्राथमिक माहिती आहे.
विदर्भातील अमरावती, वर्धा, नागपूर, भंडारा, गोदिंया, चंद्रपूर, जिल्ह्यात गारपिटीसह वादळी पावसाचा इशारा देण्यात आला होता. काही जिल्ह्यांना ऑरेंज अर्लट देण्यात आलेला आहे. दरम्यान, विदर्भातीलच वाशिम जिल्ह्यात दुपारी गारपिटीसह मुसळधार पाऊस झाला. वर्धा जिल्ह्यात अनेक भागांमध्ये अवकाळी पाऊस झाला. हलक्या स्वरूपाचा पाऊस झाला असून, वातावरणात मात्र गारवा पसरला आहे.
दुपारी तीन वाजताच्या सुमारास अचानक वातावरणात बदल झाले. आकाशात ढगांनी गर्दी केली आणि अचानक वादळी पावसाला सुरूवात झाली. जिल्ह्यातील कारंजा तालुक्यातील कामरगावमध्ये वादळी पावसाबरोबरच गारपीटही झाली. गारपिटीचा तुरीच्या पिकाला फटका बसला आहे.
सोयाबीन हरभरा-भिजला
अकोल्यात आज दुपारच्या सुमारास गारपिटीसह जोरदार पाऊस झाला. अचानक आलेल्या पावसाने अकोला कृषी उत्पन्न बाजार समितीच्या यार्डातील शेतमाल भिजला आहे. यावेळी शेतकऱ्यांनी विक्रीला आणलेलं सोयाबीन आणि हरभरा भिजला. अनेक शेतकऱ्यांचं यामुळे नुकसान झालं आहे. बाजार समितीत शेतमाल झाकण्यासाठी पुरेशी व्यवस्था नसल्याने शेतकऱ्यांनी आपलं नुकसान झाल्याचं म्हटलं आहे.
ADVERTISEMENT