मनसुख हिरेन प्रकरण असो किंवा अँटेलिया स्कॉर्पिओ प्रकरण असो कुणालाही पाठिशी घातलं जाणार नाही. जे कुणी दोषी असतील त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल असं उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी म्हटलं आहे. मुंबई पोलीस आयुक्तांची बदली केली जाणार का? असा प्रश्न विचारला असता अजित पवार म्हणाले की, “जोपर्यंत कोणाच्याही विरोधात पुरावे मिळत नाहीत तोपर्यंत प्रत्येक जण आपल्या पदावर काम राहिल” असं वक्तव्य अजित पवारांनी केलं आहे.
ADVERTISEMENT
मनसुख हिरेन प्रकरणात ATS तपास करत आहे. त्या चौकशीसाठी त्यांना कुणीही अडवलेलं नाही. तसंच जी कार मुकेश अंबानींच्या घराबाहेर मिळाली त्यात स्फोटकं असल्याने त्या प्रकरणाचा तपास NIA कडून केला जातो आहे असंही अजित पवार यांनी म्हटलं आहे.
आणखी काय म्हणाले अजित पवार?’
महाविकास आघाडी सरकार कुणालाही पाठिशी घालणार नाही. ATS आणि NIA हे चौकशी करत आहेत. दोन प्रकरणांची चौकशी दोन्ही तपास यंत्रणांकडून केली जाते आहे. जे कुणी दोषी आढळतील त्यांच्यावर कारवाई होणारच असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनीही स्पष्ट केलं आहे.
आमच्या म्हणजेच महाविकास आघाडी सरकारच्या तिन्ही पक्षांमध्ये कोणतेही मतभेद नाहीत. आमच्यात मतभेद आहेत अशा प्रकारच्या कोणत्याही बातम्यांमध्ये काहीही तथ्य नाही असंही अजित पवार यांनी स्पष्ट केलं.
अधिवेशन सुरू असताना विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्याबाबत सोशल मीडियाच्या माध्यमातून काही चुकीच्या बातम्या देण्यात आल्या. त्यावेळी संध्याकाळपर्यंत कारवाई करून अटक केली जाईल असं आश्वासन आम्ही दिलं होतं त्यावेळी आम्ही संध्याकाळी कारवाई केली, आता त्याच पद्धतीने कारवाई होईल. कुणालाही पाठिशी घालण्याचा प्रयत्न होणार नाहीच. जे कुणी दोषी असतील ज्यांच्यापर्यंत धागेदोरे जातील त्यांच्यावर कारवाई होणारच असंही अजित पवारांनी स्पष्ट केलं.
ADVERTISEMENT