‘मी वचन देतो की, शेतकऱ्याला कर्जाच्या कारणामुळे आत्महत्या करण्याची वेळ येणार नाही, कारण आपण मिळून सरकार बदलू. केंद्रातील सरकार हटवू आणि शेतकऱ्यांच्या समस्या दूर करण्याचं काम करू’, असं म्हणत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी मोदी सरकारविरोधात एकजूट होण्याचं आवाहन विरोधकांना केलं.
ADVERTISEMENT
हरयाणातल्या फतेहाबाद येथे माजी उपपंतप्रधान चौधरी देवी लाल यांच्या जयंतीनिमित्त विरोधी पक्षाची संयुक्त रॅली आयोजित करण्यात आली होती. या रॅलीत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यासह बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांची प्रमुख उपस्थिती होती.
विरोधकांच्या रॅलीत बोलताना शरद पवार म्हणाले, ‘२०२४ मध्ये केंद्रातील सरकार बदलण्यासाठी सर्वांनी एकत्र येऊन काम करण्याची वेळ आलीये. शेतकरी आत्महत्या करून आयुष्य संपवत आहेत. हा पर्याय नाहीये. सरकार बदलणे हाच खरा पर्याय आहे’, असं मत पवारांनी मांडलं.
पुढे बोलताना शरद पवार म्हणाले, ‘एक वेळ अशी होती, जेव्हा देशात अन्नधान्याचा तुडवडा होता. तेव्हा शेतकऱ्यांनी रक्ताचं पाणी करून प्रचंड प्रमाणात उत्पादन घेतलं. त्यामुळे देशातली स्थिती बदलली. आपला देश कृषी उत्पादनात पहिल्या क्रमांकावर आहे आणि यामागे फक्त शेतकऱ्यांचे कष्ट आहेत’, असं पवारांनी सांगितलं.
शेतकरी आत्महत्या प्रश्नावर शरद पवारांनी दिलं उत्तर
शरद पवार म्हणाले, ‘शेतकरी आत्महत्या करत आहेत. एका शेतकऱ्याने आत्महत्या केली. त्याने आत्महत्येपूर्वी पंतप्रधानांना पत्र लिहिलं. मी बँकेतून कर्ज घेतलंय आणि आता परतफेड करू शकत नाहीये. सरकारनंही माझं कर्ज माफ केलेलं नाही. त्यामुळे मला आत्महत्या करावी लागत आहे, असं शेतकऱ्यांनं म्हटलं होतं, असंही पवारांनी सभेत सांगितलं.
‘सोबत मिळून सरकार हटवू’; शरद पवार काय म्हणाले?
शेतकरी आत्महत्याच्या मुद्द्यावर बोलताना शरद पवारांनी केंद्रातील सरकार बदलण्यासाठी प्रयत्न करण्याचं आवाहन केलं. ‘मी वचन देतो की, कोणत्याही शेतकऱ्याला कर्जबाजारीपणामुळे आत्महत्या करावी लागणार नाही, कारण आपण मिळून सरकार बदलू. केंद्रातील सरकार हटवू आणि शेतकरी आत्महत्या थांबवण्यासाठी काम करू. आपल्यासमोर महागाई, बेरोजगारीसारखं संकट आहे, पण त्याकडे कुणीही लक्ष देत नाहीये’, असं म्हणत शरद पवारांनी केंद्रातील मोदी सरकारवर निशाणा साधला.
ADVERTISEMENT