इम्तियाज मुजावर, प्रतिनिधी, सातारा
ADVERTISEMENT
महाराष्ट्र राज्य माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार युनियन यांच्यामध्ये कंपनीतील कामगार टोळ्यांच्या नियुक्तीवरून पुन्हा एकदा टोळीयुद्ध भडकले आहे. याबाबत मुंबई-ठाणे येथील चितळकर पोलीस ठाण्यात आ. शशिकांत शिंदे यांचे समर्थक सुरेश गायकवाड यांच्यासह पाच जणांवर अदखलपात्र गुन्हा दाखल झाला आहे.
माथाडी युनियनमध्ये टोळ्यांवरून अनेकदा वाद उफाळून येत असतात. याच वादातून गेल्या काही वर्षांपूर्वी माथाडी कामगार युनियनचे नेते वसंतराव मानकुमरे यांना ‘पुजारी’ नामक व्यक्तीने जिवे मारण्याचा इशारा दिला होता. पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल झाल्यानंतर हे प्रकरण शांत झाले. त्यावेळी माथाडी कामगार युनियनचे वजनदार नेते व माजी मंत्री आ. शशिकांत शिंदे आणि वसंतराव मानकुमरे यांच्यातून विस्तवही जात नव्हता. पुढे जावली तालुक्यातील राजकीय समीकरणे बदलली तशी शिंदे व मानकुमरे यांच्यात घट्ट जवळीक वाढली. गेली पाच-सहा वर्षे वादाविना गेली.
वादाला तोंड फुटले
सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीपूर्वी माथाडी युनियनच्या कामगार मंडळातील टोळ्यांवरून आ. शशिकांत शिंदे व वसंतराव मानकुमरे यांच्यात पुन्हा वाद झाल्याची चर्चा दबक्या आवाजात सुरू होती. त्यातूनच मानकुमरे यांनी आ. शिंदे यांच्या विरोधात ज्ञानदेव रांजणे यांना विजयी करण्याचा विडा उचलला आणि विजयी मिरवणुकीत दिलखुलास डान्स केला. आंबेघर येथील ज्ञानदेव रांजणे यांच्या सत्कार कार्यक्रमात ‘माझा काटा निघाला तरी चालेल, पण जावली बॅंक आ. शशिकांत शिंदे यांच्या ताब्यात जावू देवू नका’, असे भावनिक आवाहन वसंतराव मानकुमरे यांनी केले होते. त्याचवेळी जावली तालुक्यातील ही ‘संताजी-धनाजी’ची जोडगोळी एकमेकांना घोड्यावरूनच स्वतःला ‘पाण्यात’ बघते, हे सिद्ध झाले होते.
खिंडीत गाठण्याची भाषा
जिल्हा बॅंकेच्या पराभवानंतर आ. शशिकांत शिंदे यांचा मोरघर, ता. जावली येथे माथाडी कामगार युनियनचे सुरेश गायकवाड यांनी भव्य कार्यक्रम घेऊन मानकुमरे यांना ढिवचले होते तर आ. शिवेंद्रसिंहराजे भोसले यांना जावलीत लक्ष घालणार असा इशारा दिला होता. तेव्हापासूनच आ. शिंदे व वसंतराव मानकुमरे एकमेकांना खिंडीत गाठण्याचा प्रयत्न करत आहेत.
दोघांनाही युनियनचा वारसा
१९९९ साली आ. सदाशिवराव सपकाळ यांना रोखण्यासाठी तत्कालीन काँग्रेसच्या नेत्यांनी माथाडी कामगार युनियनचे नेते शशिकांत शिंदे यांना जावलीत आणून जावली दूध संघ काँग्रेसच्या ताब्यात ठेवण्यात यश मिळवले होते. तत्पूर्वी सदाशिव सपकाळ यांनी याच युनियनचे मुंबईत काम पाहणारे वसंतराव मानकुमरे यांना जावली तालुक्याच्या राजकारणात आणून पंचायत समितीवर निवडून आणून शिवसेनेचे पश्चिम महाराष्ट्रातील पहिले सभापती केले होते. या दोन्ही नेत्यांचा उदय माथाडी कामगार युनियनच्या माध्यमातूनच तालुक्यात झाला आहे. दोघांनाही माथाडी कामगार युनियनचा वारसा आहे. मुंबईतील विविध कंपन्यांमध्ये माथाडी कामगार युनियनच्या माध्यमातून विविध कामगार टोळ्या पुरविल्या जातात. या टोळ्यांमध्ये काम करणारे हजारो कामगार जावली, पाटण, कराड., वाई आणि महाबळेश्वर तालुक्यातील रहिवाशी आहेत. माथाडी कामगार युनियनमध्ये अनेक जणांचे गट कार्यरत आहेत. त्यामुळे कंपनीला कामगार टोळ्या पुरविण्याचा ठेका आपल्यालाच मिळावा, यासाठी सर्वांचेच प्रयत्न सुरू असतात. यातूनच अनेकदा ‘टोळी युध्द’ भडकते. असाच प्रकार आ. शशिकांत शिंदे आणि वसंतराव मानकुमरे यांच्यात अनेकदा घडला आहे.
नवीन गुन्हा दाखल
डन्झो डिजिटल प्रायव्हेट लिमिटेड कंपनीत ॲडमिन मॅनेजर म्हणून काम करणार्या बाळू कृष्णा नायक वय-३४ यांनी १३ जानेवारी रोजी चितळकर पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून आ. शशिकांत शिंदे समर्थक सुरेश गायकवाड, दिलीप जमादार, विशाल यादव, मंगेश भोसले, प्रदीप पुजारी या पाच जणांवर दमदाटी करणे व शिवीगाळ करणे या कारणावरून अदखलपात्र गुन्हा दाखल झाला आहे. डन्झो डिजिटल कंपनी ऑनलाइन किराणामाल, औषधे, भाजीपाला आदी साहित्य वितरणाचा व्यवसाय करते. या कंपनीचे गोडावून तिकुजनीवाडी रोड चितळसर सानपाडा, ठाणे येथे आहे. या कंपनीने सीडी सेफ्टी आणि सिक्युरिटी सर्व्हिसेस यांच्या माध्यमातून टोळी क्रमांक ५२३ व ४२४ यांना माल उचलण्याचा लेखी परवाना दिला आहे. तसे या कंपनीने किराणा बाजार व दुकाने मंडळाला लेखी कळवले आहे. पण टोळी क्रमांक ५४० मधील कामगार मंगेश शिवाजी भोसले, प्रदीप रामनाथ पुजारी, योगेश गोपीनाथ पाटील यांनी महाराष्ट्र माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार युनियनच्या वतीने सीडी आणि सिक्युरिटी सर्व्हिसेसला नोटीस पाठवून हे काम आमच्या टोळी क्रमांक ५४० ला मिळाली असल्याची कळविले आहे. किराणा बाजार व दुकाने मंडळाचे विद्युत निरीक्षक बी. आर. कदम यांनी कांदिवली येथील कार्यालयास भेट दिली असता डन्झो डिजिटल प्रायव्हेट लिमिटेड कंपनीचे बनावट लेटरहेड वापरून हे काम टोळी क्रमांक ५४० ला मिळाले असल्याचे भासवले जात आहे. ही आमच्या कंपनीची फसवणूक असून याप्रकरणी सुरेश गायकवाड, दिलीप जमादार, विशाल यादव, मंगेश भोसले, प्रदीप पुजारी यांच्या विरोधात बाळू कृष्णा नायक यांनी चितळकर पोलीस ठाण्यात दमदाटी करून शिवीगाळ केल्याची फिर्याद नोंद केली आहे.
या फिर्यादीमुळे माथाडी कामगार मंडळात पुन्हा एकदा टोळी युद्धाने डोके वर काढण्यास प्रारंभ केल्याचे दिसून येत आहे.
ADVERTISEMENT