नाशिकमध्ये आणि सोलापूरमध्ये टोमॅटोला भाव न मिळाल्याने संतप्त शेतकऱ्यांनी तो रस्त्यावर फेकला आहे. नाशिकमधील शरद पवार मार्केट यार्डमध्ये शेतकऱ्यांनी टोमॅटो रस्त्यावर फेकले. टोमॅटोच्या एका जाळीला फक्त 20 ते 30 रूपये दर मिळत असल्याने शेतकरी संतापले. टोमॅटोला आज अवघा एक ते दीड रूपया प्रति किलो भाव मिळत होता इतका अत्यल्प भाव घेण्यापेक्षा शेतकऱ्यांनी तो रस्त्यावर फेकून याबाबतचा निषेध नोंदवला आणि आपला संताप व्यक्त केला. शेतकरी नेते सदाभाऊ खोत यांच्यासमोर ही घटना घडली.
ADVERTISEMENT
आम्हाला किलोला सव्वा रूपया आणि दीड रूपया भाव देत आहेत. मग आम्ही नेमकं करायचं तरी काय? टोमॅटोचं उत्पादन काढण्यासाठी 80 हजारांहून जास्त खर्च झाले आहेत. पाणी द्यायचं, शेत राखायचं आणि भाव मिळणार कवडीमोल. अशावेळी आम्ही काय करायचं? असा प्रश्न नाशिकच्या शेतकऱ्यांनी विचारला आहे.
येवला तालुक्यातील अंदरसुल गावातील तरुण शेतकरी आदित्य जाधव याने टोमॅटोला भाव मिळत नसल्याने संतप्त होत रस्त्यावर टोमॅटो फेकून दिले.या शेतकऱ्याने एक एकर क्षेत्रामध्ये टोमॅटोचे पीक घेतले होते .टोमॅटो निघण्यास सुरुवात झाली, सुरुवातीला भाव मिळाला मात्र दिवसेंदिवस टोमॅटोचे भाव कोसळत गेल्याने या शेतकऱ्याला पंचवीस रुपये कॅरेट टोमॅटोला भाव मिळाल्याने संतप्त होत या टोमॅटो उत्पादक शेतकऱ्यांने मनमाड- शिर्डी महामार्गावर येवल्यातील विंचूर चौफुली येथे टोमॅटो फेकत आपला संताप व्यक्त केला.
दुसरीकडे सोलापूरच्या मोहोळ तालुक्यात सुकून गायकवाड या शेतकऱ्यानेही टोमॅटोला कवडीमोल भाव नसल्याने टोमॅटो रस्त्याच्या कडेला फेकून दिले. टोमॅटोला अगदी कवडी मोल भाव आल्याने बाजारपेठेत टोमॅटो नेण्यासाठीच्या भाड्याचे पैसे देखील निघत नसल्याने टोमॅटो फेकून देण्याची वेळ शेतकऱ्यांवर आलीय. जीवापाड टोमॅटोला जपून अगदी लालबुंद टोमॅटोची रास तयार केली मात्र ती रस्त्यावर फेकून देण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली आहे.
आम्ही शेतात सव्वा लाख रूपये खर्च करून टोमॅटो लावला होता. पण बाजारात त्याला भावच नाही मग तो फेकून देण्याशिवाय पर्याय उरलेला नाही. आमच्याकडे भारत सरकारने आणि राज्य सरकारने दुर्लक्ष केलं आहे. असंच दुर्लक्ष होत राहिलं तर शेतकरी शेती करणं सोडून देईल आणि लोकांवर अन्न अन्न करण्याची वेळ येईल हे विसरू नये असं सुकून गायकवाड यांनी म्हटलं आहे.
ADVERTISEMENT