आपत्कालिन परिस्थितीसाठी तुळजाभवानी मंदिर सज्ज : नवरात्रौत्सवाची तयारी अंतिम टप्प्यात

मुंबई तक

• 08:10 AM • 25 Sep 2022

तुळजापूर : येत्या 26 सप्टेंबरपासून सुरु होत असलेल्या नवरात्रौत्सवाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्राची कुलस्वामिनी आणि साडेतीन शक्तीपीठांपैकी एक पूर्ण पीठ असलेले तुळजाभवानी मंदिर सज्ज झाले आहे. नवरात्रौत्सव यशस्वीपणे पार पाडण्यासाठी मंदिर व्यवस्थापनाने अत्यंत काटेकोर नियोजन केले आहे. तसेच आपत्कालिन परिस्थिती उद्धभवल्यास ती हातळण्यासाठीही प्रशासनाने नियोजन केले आहे. मंदिर 22 तास खुले राहणार : तुळजाभवानी मंदिर शारदीय नवरात्र […]

Mumbaitak
follow google news

तुळजापूर : येत्या 26 सप्टेंबरपासून सुरु होत असलेल्या नवरात्रौत्सवाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्राची कुलस्वामिनी आणि साडेतीन शक्तीपीठांपैकी एक पूर्ण पीठ असलेले तुळजाभवानी मंदिर सज्ज झाले आहे. नवरात्रौत्सव यशस्वीपणे पार पाडण्यासाठी मंदिर व्यवस्थापनाने अत्यंत काटेकोर नियोजन केले आहे. तसेच आपत्कालिन परिस्थिती उद्धभवल्यास ती हातळण्यासाठीही प्रशासनाने नियोजन केले आहे.

हे वाचलं का?

मंदिर 22 तास खुले राहणार :

तुळजाभवानी मंदिर शारदीय नवरात्र उत्सव काळात 22 तास खुले राहणार आहे. त्यामुळे 26 सप्टेंबर (घटस्थापना) ते 5 ऑक्टोबर (दसरा) या काळात भाविकांना 22 तास दर्शन घेता येणार आहे. कोरोनानंतर होत असलेल्या पहिल्याच नवरात्र उत्सवामुळे भाविकांची संभाव्य गर्दीच्या पार्श्वभूमीवर मंदिर प्रशासनाने हा निर्णय घेतला आहे.

उत्सव काळात मंदिर मध्यरात्री 1 वाजता उघडले जाणार असून ते दुसऱ्यादिवशी रात्री 11 वाजेपर्यंत म्हणजे 22 तास सुरु राहणार आहे. यंदा कोणतेही निर्बंध नसल्याने नवरात्र काळात लाखो भाविकांची गर्दी होण्याचा अंदाज आहे. त्या अनुषंगाने मंदिर प्रशासन, पोलीस प्रशासन, नगर परिषद, आरोग्य विभाग ही सर्व यंत्रणा कामाला लागली असून स्वच्छता, भाविकांचे आरोग्य व सुविधा याला प्राधान्य देण्यात आले आहे.

200 कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण :

नवरात्रौत्सव काळात आपत्कालिन परिस्थिती हाताळण्यासाठी आरोग्य विभाग आणि भारत विकास ग्रुप अर्थात BVG कडून 108 क्रमांकाच्या 12 रुग्णवाहिका उपलब्ध करुन देण्यात आल्या आहेत. तसेच रुग्णाला कमीत कमी वेळेत वैद्यकीय मदत मिळावी या उद्देशांनी मंदिर परिसरातील कर्मचारी वर्गाला ‘प्रथम प्रतिसाद प्रशिक्षण’ म्हणजे First Responder training देण्यात आले आहे. तहसिलदार तथा मंदिर संस्थानाच्या व्यवस्थापक योगिता कोल्हे यांच्या मार्गदर्शनात जवळपास 200 कर्मचाऱ्यांनी या प्रशिक्षणाचा लाभ घेतला.

सोललेले नारळ व सुटे तेल विक्री बंद

शारदीय नवरात्र उत्सव काळात तुळजाभवानी मंदिर परिसरात सोललेले नारळ व सुटे तेल विक्री करण्यास बंदी घालण्यात आली आहे. महोत्सव कालावधीत भाविकांच्या सुरक्षिततेसाठी 17 सप्टेंबर ते 11 ऑक्टोबर 2022 या कालावधीत तुळजाभवानी मंदिर येथे 200 मीटर परिसरात सोललेले नारळ व सुटे तेल विक्री करण्यास बंदी घालण्यात आली आहे.

असा असेल नवरात्र उत्सव

तुळजाभवानी देवीची मंचकी निद्रा 17 सप्टेंबर रोजी सायंकाळी सुरु झाली असून 26 सप्टेंबर रोजी विधिवत पूजा करुन दुपारी 12 वाजता घटस्थापना होणार आहे. 29 सप्टेंबर रोजी देवीची रथ अलंकार पूजा, 30 सप्टेंबर रोजी ललित पंचमी असून मुरली अलंकार पूजा,1 ऑक्टोबर रोजी शेषशाही अलंकार पूजा, 2 ऑक्टोबर रोजी भवानी तलवार अलंकार पूजा, 3 ऑक्टोबर रोजी दुर्गाष्टमी असून महिषासुर मर्दीनी अलंकार पूजा तर 5 ऑक्टोबर रोजी विजयादशमी म्हणजेच दसरा असणार आहे. 9 ऑक्टोबर रोजी कोजागिरी पौर्णिमा असणार आहे.

    follow whatsapp