जळगाव: विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी सलग दुसऱ्या दिवशी भलभल्या राजकीय तज्ज्ञांनाही बुचकळ्यात पाडलं आहे. कारण देवेंद्र फडणवीस यांनी खेळीच तशी केली आहे की, ज्यामुळे राजकीय पंडितही चकीत झाले आहेत. ते देखील सलग दुसऱ्या दिवशी. म्हणजेच देवेंद्र फडणवीस यांनी सलग दोन दिवस महाराष्ट्रातील अशा नेत्यांच्या भेटीला गेले की, ज्यामुळे राजकीय वर्तुळात आता उलटसुलट चर्चा सुरु झाल्या आहेत.
ADVERTISEMENT
देवेंद्र फडणवीस यांच्या दोन दिवसात दोन गुगली:
माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राजकीय खेळपट्टीवर सलग दोन दिवस दोन भन्नाट गुगली (political googlies) टाकल्या आहेत. ज्या राजकारणतील भल्याभल्या नेत्यांना देखील समजू शकलेल्या नाहीत. काय आहेत देवेंद्र फडणवीस यांच्या दोन गुगली जाणून घेऊयात सविस्तर:
देवेंद्र फडणवीसांची पहिली गुगली
देवेंद्र फडणवीस यांनी काल (31 मे) सकाळी साडे अकरा वाजेच्या सुमारास मुंबईत एक पत्रकार परिषद घेऊन महाविकास आघाडी सरकार तुफान टीका केली. यावेळी देवेंद्र फडणवीस यांनी ओबीसींचं स्थानिक स्वराज्य संस्थांमधील राजकीय आरक्षण फक्त सध्याच्या सरकारमुळे गमावलं असल्याची जोरदार टीका केली. पण ही बैठक संपताच फडणवीस यांनी आपला संपूर्ण ताफा थेट राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांच्या मुंबईतील सिल्व्हर ओक या निवासस्थानी वळवला.
या ‘भेटी’मागे दडलंय काय…? शरद पवार-फडणवीस भेटीमागचे साडेतीन अर्थ!
यावेळी देवेंद्र फडणवीस यांनी शरद पवार यांची एकांतात भेट घेतली. ही भेट खरं तर फक्त 15 मिनिटांचीच झाली. पण या भेटीत या दोन नेत्यांमध्ये नेमकी काय चर्चा हे गुलदस्त्यातच आहे. पण ही फक्त सदीच्छा भेट होती असं म्हणून फडणवीस यांनी ही भेट चर्चेत कशी राहील याचीच अधिक काळजी घेतली आणि ही त्यांची भेट हीच फडणवीसांची पहिली गुगली होती.
देवेंद्र फडणवीसांची दुसरी गुगली:
राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांची भेट घेऊन फडणवीसांना 24 तास देखील उलटले नाही तोच त्यांनी आज (1 जून) राजकीय खेळपट्टीवरची दुसरी गुगली टाकली. पहिल्या गुगलीपेक्षा फडणवीसांची दुसरी गुगली ही भलतीच वेगळी होती. कारण, राजकीय पटलावर ज्या व्यक्तीने आपण फक्त देवेंद्र फडणवीस यांच्यामुळेच भाजप सोडून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जात आहोत अशी टीका केली त्याच नेत्याच्या घरी आज स्वत: फडणवीस जाऊन पोहचले.
पवारांच्या भेटीनंतर देवेंद्र फडणवीस एकनाथ खडसेंच्या घरी, राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण
खरं तर देवेंद्र फडणवीस हे आज जळगावच्या दौऱ्यावर जाणार होते. हे जळगावमधील सर्वच यंत्रणांना ठाऊक होतं. मात्र, फडणवीस हे थेट राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे (Eknath Khadse) यांच्या घरी जातील असं कुणालाही वाटलं नव्हतं. मात्र, या दौऱ्याच्या सुरुवातीलाच त्यांनी एकनाथ खडसे यांच्या घरापासूनच सुरुवात केली. मात्र, यावेळी एकनाथ खडसे हे घरी नसल्याने फडणवीस यांची भेट होऊ शकली नाही. त्यामुळे खडसेंच्या स्नुषा रक्षा खडसे यांनी फडणवीस यांचा पाहुणचार केला. यावेळी देवेंद्र फडणवीस यांनी एकनाथ खडसेंच्या नातवाशी देखील बराच वेळ गप्पा मारल्या.
दरम्यान, देवेंद्र फडणवीस यांच्या आजच्या या भेटीनंतर राजकीय वर्तुळात नव्याच चर्चेला सुरुवात झाली आहे. त्यामुळे आता पुढच्या काही दिवसात देवेंद्र फडणवीस हे नव्या धक्कातंत्राचा वापर करणार का? हे पाहणं देखील महत्त्वाचं ठरणार आहे.
ADVERTISEMENT