पंतप्रधानांच्या बैठकीत उद्धव ठाकरे अनुपस्थित, मुख्यमंत्र्यांची प्रकृती पुन्हा खालावल्याची चर्चा का होते आहे?

मुंबई तक

• 05:51 AM • 14 Jan 2022

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुरूवारी 30 राज्यांच्या मुख्यमंत्र्यांशी संवाद साधला. त्यांनी देशातील कोरोनाची नेमकी स्थिती काय आहे त्याचा आढावा घेतला. या बैठकीला महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनाही सहभागी होण्यास सांगितलं होतं. मात्र ते या बैठकीत सहभागी होऊ शकले नाहीत. त्यांच्याऐवजी आरोग्यमंत्री राजेश टोपे आणि गृहमंत्री दिलीप वळसे पाटील हे या बैठकीत ऑनलाईन सहभागी झाले होते. […]

Mumbaitak
follow google news

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुरूवारी 30 राज्यांच्या मुख्यमंत्र्यांशी संवाद साधला. त्यांनी देशातील कोरोनाची नेमकी स्थिती काय आहे त्याचा आढावा घेतला. या बैठकीला महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनाही सहभागी होण्यास सांगितलं होतं. मात्र ते या बैठकीत सहभागी होऊ शकले नाहीत. त्यांच्याऐवजी आरोग्यमंत्री राजेश टोपे आणि गृहमंत्री दिलीप वळसे पाटील हे या बैठकीत ऑनलाईन सहभागी झाले होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बोलावलेली ही बैठक व्हीडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे पार पडली. या बैठकीत उद्धव ठाकरे उपस्थित नसल्याने त्यांच्या प्रकृतीची चर्चा पुन्हा एकदा सुरू झाली आहे.

हे वाचलं का?

भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे व्हीडिओ कॉन्फरन्सिंगद्वारेही बैठकीला हजर राहू शकत नाहीत का? एवढी त्यांची प्रकृती चांगली नाही का? असा प्रश्न विचारला आहे. त्यामुळे पुन्हा एकदा उद्धव ठाकरेंच्या प्रकृतीबाबत चर्चा सुरू झाल्या आहेत. तसंच मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना राज्याची काळजी आहे की नाही असाही प्रश्न चंद्रकांत पाटील यांनी विचारला आहे.

काय आहे चंद्रकांत पाटील यांचं ट्विट?

मुख्यमंत्र्यांचं नक्की चाललंय तरी काय ? मंत्रालयात गैरहजेरी, अधिवेशनात गैरहजेरी आणि आता पंतप्रधान नरेंद्र मोदी जी यांच्या महत्त्वपूर्ण बैठकीला गैरहजेरी ! राज्याच्या जनतेची काही काळजी आहे की नाही ? असं ट्विट चंद्रकांत पाटील यांनी केलं आहे.

काय म्हणाले हसन मुश्रीफ?

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे कॅबिनेटच्या बैठकीत दोन तास उपस्थित होते. त्यांची प्रकृती चांगली आहे. आवाजही व्यवस्थित वाटला. त्यामुळे ते व्यवस्थित आहेत हे मी सांगू शकतो. डॉक्टरांच्या सल्ल्याने ते बाहेर कधी पडायचं ते ठरवतील.

काय म्हणाले राजेश टोपे?

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत होणाऱ्या बैठकीला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे प्रकृतीच्या कारणामुळेच येऊ शकलेले नाहीत. दोन तास किंवा त्यापेक्षा अधिक वेळ या बैठकीत बसून रहावं लागतं. त्यामुळे त्यांच्या डॉक्टरांनी त्यांना उपस्थित राहू नका असा सल्ला दिला असावा म्हणून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बोलावलेल्या बैठकीत उपस्थित नव्हते.

पंतप्रधान नरेंद्र मोदींकडून सगळ्या राज्यांतील कोरोना स्थितीचा आढावा, महाराष्ट्राने काय केल्या मागण्या?

१२ नोव्हेंबरला मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर शस्त्रक्रिया करण्यात आली. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना एच एन रिलायन्स रूग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मान आणि मणक्याचा त्रास सुरू झाला होता. त्यामुळे त्यांना मानेला कॉलर लावावी लागत होती. अनेक कार्यक्रमात ते कॉलर लावून उपस्थित होती. मान आणि मणक्याच्या त्रास उद्भवल्याने उद्धव ठाकरे एच.एन. रिलायन्स रुग्णालयात दाखल झाले होते.

विविध चाचण्या करण्यात आल्यानंतर त्यांच्या मणक्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली. मणक्यावरील शस्त्रक्रिया यशस्वी झाली असून, उपचार सुरू आहेत अशी माहितीही देण्यात आली. डिसेंबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यात मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना डिस्चार्ज देण्यात आला.

‘महाराष्ट्राच्या राबडीदेवी’ असं रश्मी ठाकरेंना भाजपने संबोधलं, शिवसेनेचा तिळपापड का होतो आहे?

हिवाळी अधिवेशनाही अनुपस्थिती

या सगळ्यानंतर आलं ते म्हणजे हिवाळी अधिवेशन. हिवाळी अधिवेशनात चहा पानाच्या दिवशी मुख्यमंत्री आले नाहीत. त्यानंतर अजित पवार यांनी पत्रकार परिषदेत सांगितलं की मी स्टँपपेपरवर लिहून देतो की मुख्यमंत्री अधिवेशनात येतील. तरीही ते आले नाहीत, त्याबद्दल नंतर अजित पवार यांनी दिलगिरी व्यक्त केली. मात्र मुख्यमंत्र्यांनी कोरोना रूग्ण वाढत असल्याने कॅबिनेटची बैठक घेतली. त्या बैठकीतला व्हीडिओही व्हायरल झाला होता. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व्हीडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे या बैठकीत सहभागी झाले होते. 23 डिसेंबरला ही बैठक झाली होती. अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी मुख्यमंत्री येतील असं वाटलं होतं. मात्र संपूर्ण अधिवेशनात त्यांची ऑनलाईन झलक वगळता दर्शन झालंच नाही. विरोधकांनीही याबाबत प्रश्न विचारण्यास सुरूवात केली.

आता पुन्हा एकदा उद्धव ठाकरेंना काय झालंय ही चर्चा महाराष्ट्रात सुरू झाली आहे कारण त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोरोना संदर्भात बोलावलेल्या बैठकीला उद्धव ठाकरे अनुपस्थित राहिले. प्रकृतीच्या कारणामुळे ते उपस्थित राहिले नाहीत ही माहिती राजेश टोपे यांनी दिली आहे. तर चंद्रकांत पाटील यांनी त्यांची प्रकृती इतकी खालावली आहे का असं म्हणत चर्चेला तोंड फोडलं आहे.

रश्मी ठाकरेंकडे कार्यभार देण्याची चर्चा

नितेश राणे यांनी काही दिवसांपूर्वी सोनी लिव्ह वरील महारानी या वेबसीरिजचं पोस्टर ट्विट केलं आणि महाराष्ट्रावर अशी वेळ येऊ नये असं म्हटलं होतं. या वेब सीरिजमध्ये बिहारचे मुख्यमंत्री आजारी होतात आणि मग त्यांच्या पत्नीला मुख्यमंत्रीपद स्वीकारावं लागतं. ही वेबसीरिज राबडीदेवींवर बेतलेली होती अशीही चर्चा झाली होती. मात्र नितेश राणेंनी हे पोस्टर ट्विट करून अशी वेळ महाराष्ट्रावर येऊ नये म्हटलं होतं. तेव्हापासून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे रश्मी ठाकरेंकडे कार्यभार सोपवणार का? याची चर्चा रंगली.

महाराष्ट्राच्या हिवाळी अधिवेशनाच्या पूर्वीही चंद्रकांत पाटील यांचं वक्तव्य होतं की उद्धव ठाकरे खूपच आजारी असतील तर त्यांनी रश्मी ठाकरेंना मुख्यमंत्री करा, पण राज्याला पूर्णवेळ मुख्यमंत्री द्या असं म्हटलं होतं.

उद्धव ठाकरे हे सध्या डॉक्टरांच्या सल्ल्याने आराम करत आहेत. उद्धव ठाकरे यांच्यावर नोव्हेंबर महिन्यात शस्त्रकिया पार पडली. पक्षातल्या अनेकांचं असं म्हणणं आहे की मुख्यमंत्री व्हीडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे चर्चा करत आहेत, बैठका घेत आहेत. सरकारचं कामही ते व्यवस्थित करत आहेत. इतिहासातही अनेक उदाहरणं आहेत की जेव्हा देशाचे, राज्याचे प्रमुख आजारी झाल्यानंतरही आपला कार्यभार दुसऱ्या कुणाकडे सोपवत नाहीत. अटलबिहारी वाजपेयी यांच्या गुडघ्यांवर शस्त्रक्रिया झाली तेव्हा पंतप्रधान कार्यालयाचा कारभार मुंबईतून चालत होता. आत्ता उद्धव ठाकरेही कारभार चालवत आहेत. तरीही पंतप्रधान मोदींनी बोलावलेल्या बैठकीला ते हजर नव्हते त्यामुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना झालंय तरी काय? असा प्रश्न पुन्हा पुन्हा भाजपकडून उपस्थित केला जातो आहे.

    follow whatsapp