एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेत बंड पुकारल्यानंतर महाराष्ट्राच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे. अशात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी फेसबुक लाईव्हद्वारे महाराष्ट्राशी संवाद साधला. त्यात त्यांनी शिवसैनिकांना भावनिक साद घातली तसंच वेळ प्रसंगी मी मुख्यमंत्रीपद सोडायला तयार आहे. तसंच तुम्ही मला सांगत असाल तर मी शिवसेनेचं पक्षप्रमुख पदही सोडायला तयार आहे. मात्र जे काही सांगायचं आहे ते समोर येऊन सांगा. एकाही शिवसैनिकाने येऊन सांगितलं तर मी आत्ता पद सोडून देतो असं उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे.
ADVERTISEMENT
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी फेसबुक लाइव्हद्वारे जेव्हा संवाद साधला त्याआधी त्यांच्यात नेमका काय संवाद झाला तो संवाद मुंबई तकला समजला आहे. २०१९ मध्ये शरद पवार आणि संजय राऊत यांनी महाविकास आघाडीचा प्रयोग केला. मात्र एकनाथ शिंदे यांची नाराजी तेव्हापासूनच वाढत गेली. त्याचा परिणाम या सर्वात मोठ्या बंडामध्ये झाला आहे.
Exclusive : एकनाथ शिंदे यांच्याकडे ४६ आमदारांचं बळ, लवकरच पुढचा निर्णय
उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांच्यात काय बोलणं झालं?
उद्धव ठाकरे : तुम्हाला काय हवं आहे ते सांगा. मी मुख्यमंत्री नकोय हे तुम्हाला हवंय का? तुम्ही मुख्यमंत्री व्हा मी पद सोडतो.
एकनाथ शिंदे: राजीनामा देणं हा तुमचा प्रश्न आहे. तो निर्णय तुम्ही घ्यायचा आहे.
उद्धव ठाकरेः मी वर्षा सोडून जातो, मातोश्रीवर राहाण्यास जातो. पदाचा राजीनामा देतो तुम्ही या आणि वर्षा निवासस्थानावर राहा.
एकनाथ शिंदेः उद्धवसाहेब ती वेळ आता निघून गेली आहे. ती वेळ २०१९ मध्येच आली होती आता ती वेळ निघून गेली आहे.
हे संभाषण आज या दोघांमध्ये झाल्याचं मुंबई तकला समजलं आहे. आज सकाळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी एकनाथ शिंदे यांना फोन केला होता. फेसबुक लाईव्हमध्ये जे आवाहन त्यांनी केलं अगदी तसंच आवाहन आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी एकनाथ शिंदे यांना केलं. मात्र आता ती वेळ निघून गेली असं एकनाथ शिंदे यांनी सांगितलं.
उद्धव ठाकरे यांनी फेसबुक लाइव्हमध्ये काय सांगितलं?
“भाजपसोबत आपण जाणार नाही हे तेव्हा ठरलं. त्यानंतर काय घडलं ते कुणाला सांगायची आवश्यकता नाही. महाविकास आघाडी स्थापन होत असताना मला शरद पवार म्हणाले की तुम्ही दोन मिनिटं बाजूला या. त्यावेळी शरद पवारांनी मला सांगितलं की महाविकास आघाडीचे मुख्यमंत्री तुम्ही व्हा. आमच्या पक्षात आणि काँग्रेसमध्ये वरिष्ठ मंडळी आहेत. ती तुमच्या नेतृत्वात एकसंघ राहतील. त्यामुळे तुम्हीच मुख्यमंत्री व्हा. मी त्यावेळी त्यांना नकार दिला होता. मात्र शरद पवार यांनी सांगितलं की इतर कुणी मुख्यमंत्री होणार असेल तर कठीण होईल. त्यामुळे मी मुख्यमंत्री झालो.” असं आज उद्धव ठाकरेंनी सांगितलं.
एवढंच नाही तर पुढे उद्धव ठाकरे म्हणाले की, तुम्हाला वाटत असेल तर समोर या, माझ्याशी चर्चा करा मी आत्ता मुख्यमंत्रीपद सोडतो. मी पुन्हा एकदा सांगतो की, हा अगतिकता नाही. आजपर्यंत अशी अनेक आव्हानं आपण बिनसत्तेची पेलली आहेत. हे काय मोठं आव्हान आहे. काय होईल जास्तीत जास्त.. लढू.. परत लढू.. जोपर्यंत माझ्यासोबत शिवसैनिक आहेत. तोपर्यंत मी कोणत्याही संकटाला भीत नाही. आव्हानाला सामोरा जाणारा माणूस आहे. त्यामुळे कोणत्याही आव्हानाला पाठ दाखवणारा मी नाही, असंही उद्धव ठाकरेंनी म्हटलं आहे.
ADVERTISEMENT