शिवसेनेतल्या बंड्यानं महाराष्ट्राचं राजकारण ढवळून निघालं. पण, आता लक्ष लागलंय ते दसरा मेळाव्यांकडे. इतिहासात पहिल्यांदाच शिवसेना फुटून दोन मेळावे होत आहेत आणि त्यामुळेच एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरेंनी ताकद दाखवण्यासाठी प्रतिष्ठा पणाला लावलीये. शिंदे गटाकडून शक्तिप्रदर्शन करण्यासाठी नियोजन करण्यात आलंय. तसंच नियोजन उद्धव ठाकरेंकडूनही करण्यात आलंय.
ADVERTISEMENT
दसरा मेळाव्यासाठी शिवसेनेला शिवाजी पार्क मैदान मिळालं. मेळाव्यातल्या उद्धव ठाकरेंच्या भाषणाकडे सगळ्यांचं लक्ष असणारच आहे. त्याचबरोबर लक्ष असणार आहे गर्दी कुणाकडे असणार. तर शिंदेंपेक्षा जास्त ताकद दाखवण्यासाठी ठाकरेंनीही प्लानिंग केलंय.
दसरा मेळाव्यासाठी शिवसेनेचं प्लानिंग काय?
मिळालेल्या माहितीनुसार मुंबईतल्या छत्रपती शिवाजी पार्क मैदानावर होत असलेल्या दसरा मेळाव्यासाठी मुंबईतून प्रत्येक शाखेतून ४ बसेस निघणार आहेत. मुंबई एकूण २२७ शाखा आहे म्हणजे एकूण ९०८ बसेस या मुंबईतल्याच असणार आहे. मुंबईतुन ठाकरेंना यंदा ५० हजारांपेक्षा जास्त गर्दी अपेक्षित असून, त्यासाठी मुंबईतल्या विभागप्रमुखांनी आपली ताकद पणाला लावली आहे.
विभागप्रमुखांवर दसरा मेळाव्याची जबाबदारी
मुंबईत शिवसेनेचे १२ विभागप्रमुख आहेत. प्रत्येक विभागप्रमुखाला दसरा मेळाव्याची जबाबदारी देण्यात आलीये. या सर्व विभागप्रमुखांवर शिवसेनेचे नेते काम करत आहेत. मुंबई व्यतिरिक्त ठाणे, पालघर, नवी मुंबई, रायगड आणि नाशिक मधून मोठी गर्दी अपेक्षित आहे. मुंबईच्या बाहेरून साधारणतः ५० हजार कार्यकर्ते येण्याची शक्यता आहे.
शिवसेना दसरा मेळावा २०२२ : रेल्वेने येणार कार्यकर्ते
खासदार राजन विचारेंकडे ठाण्यासह, मीरा-भाईंदर आणि नवी मुंबईतल्या कार्यकर्त्यांची जबाबदारी देण्यात आलीये. एकनाथ शिंदेच्या बंडानंतरचा हा पहिलाच मेळावा असल्यानं पश्चिम महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्र आणि मराठवाड्यातून ट्रेननं मोठ्या संख्येनं कार्यकर्ते येणार आहेत.
जेवणाची पाकिटं खुर्च्यांवर ठेवली जाणार
मिळालेल्या माहितीनुसार दसरा मेळाव्यासाठी हजारोंच्या संख्येनं येणाऱ्या लोकांसाठी पाणी आणि जेवणाची पाकिटं आधीच खुर्च्यांवर ठेवली जाणार आहेत. तसेच मोबाईल टॅायलेट्सच्या अनेक गाड्या मैदानाच्या सुरुवातीला ठेवण्यात येणार आहेत. शिवाजी पार्कच्या स्टेजवर शिवसेनेच्या नेत्यांनाच बसायचं स्थान दिलं जाणार आहे.
उद्धव ठाकरेंच्या आधी कुणाची भाषणं होणार?
किशोरी पेडणेकर, अरविंद सावंत, नितिन बानुगडे पाटील, आदित्य ठाकरे यांची भाषण आधी होतील, अशी माहिती आहे. तसेच काही नवीन चेहऱ्यांना भाषणं करण्याची संधी मिळू शकते. त्यानंतर ७.३० वाजता उद्धव ठाकरे यांचं भाषण होईल, अशी माहिती आहे.
ADVERTISEMENT