उद्धव ठाकरेंनी चिखलीत आयोजित करण्यात आलेल्या शेतकरी मेळाव्यात बंडखोर आमदारांना लक्ष्य केलं. यावेळी उद्धव ठाकरेंनी शिंदे गटातील यवतमाळच्या खासदार भावना गवळींवर टीकेचे बाण डागले. भावना गवळींनी पंतप्रधानांना बांधलेल्या राखीच्या घटनेचा हवाला देत ठाकरेंनी खासदार गवळींना डिवचलं.
ADVERTISEMENT
चिखलीतल्या सभेत बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले, “काही जुने चेहरे आज दिसत नाहीयेत. जुने होते ते फसवे होते. गद्दार निघाले. त्यांना असं वाटलं की बुलढाणा म्हणजे त्यांची मालमत्ता आहे. हे जे मर्द मावळे इकडे जमले आहेत… आज तुमच्या उत्साहाकडे बघून असंच वाटतंय की, या धगधगत्या मशाली अन्याय जाळायला निघाल्या आहेत”,
“आपलं सरकार व्यवस्थित चाललं होतं, पण आपलं सरकार पाडलं गेलं. आज सगळे गुवाहाटीला गेलेले आहेत. त्यांना तिथे आशीर्वाद घ्यायला जायची गरज लागली, मी तुमचे आशीर्वाद घ्यायला आलोय. मी जिजाऊंच्या जन्मस्थानी शेतकरी, बंधू भगिनींचे आशीर्वाद घ्यायला आलोय. मी नव्या दमानं आणि त्वेषाने उभा आहे. जिंकणार म्हणजे जिंकणारच. माझा आत्मविश्वास तुम्ही आहात”, असं उद्धव ठाकरे म्हणाले.
Uddhav Thackeray Speech : उद्धव ठाकरे चिखलीच्या सभेत शिंदे गटासह भाजपवर बरसले
शिंदे गटातल्या आमदारांना उद्धव ठाकरे पुन्हा म्हणाले, ‘गद्दार’
“अनेकांना तिकडे घेऊन गेले. काही जण आजही माझ्यासोबत आहेत. अरविंद सावंत आहेत, विनायक राऊत आहेत. आपल्या पलिकडच्या ताई तुम्हाला माहितीये ना? आपण त्यांना दोनदा-चारदा किती वेळा खासदार केलं तुम्हाला माहितीये. इथल्या गद्दारांनाही तुम्हीच राबराब राबून आमदार आणि खासदार केलं होतं”, असं म्हणत उद्धव ठाकरेंनी बंडखोर आमदारांवर टीकास्त्र सोडलं.
“या ताईंना धमक्या देण्यात आल्या. खास मुंबईवरून दलाल इकडे पाठवले जायचे. त्यांच्यावरचे सगळे आरोप वाचले गेले. त्यांच्या आजूबाजूचे जे चलेचपाटे होते, त्यांना अटक झाली. पण, ताई मोठ्या हुशार. ताईंनी काय केलं, तर थेट पंतप्रधानांना राखी बांधली”, असं म्हणत ठाकरेंनी भावना गवळींना डिवचलं.
भाजप भाकड झालेला पक्ष -उद्धव ठाकरे
“भैय्या मेरे राखी के बंधन को निभाना. तो फोटो छापून आणला. तो फोटो छापून आणल्यावर ईडी, सीबीआय वाल्यांची हिंमत आहे का. हे काय लोक बघत नाहीयेत का? मग मुद्दा काय आहे की आपणही 25-30 वर्ष भाजपसोबत होतो. आज भाजप आयात पक्ष झालेला आहे. विचार संपले, नेते संपलेत. भाकड पक्ष झालेला आहे”, असं टीकास्त्र उद्धव ठाकरेंनी भावना गवळी आणि भाजपवर डागलं.
ADVERTISEMENT