मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना स्वातंत्र्याचा हिरक महोत्सव आहे की अमृत महोत्सव हे माहित नाही. त्यावरून केंद्रीय मंत्री नारायण राणेंनी मी तिथे असतो तर कानाखाली खेचली असती असं वक्तव्य केलं. ज्यानंतर मंगळवारी नारायण राणे विरूद्ध शिवसेना असा सामना महाराष्ट्रभर पाहण्यास मिळाला. नारायण राणेंना या प्रकरणी अटकही झाली. आजही हा वाद शमताना दिसत नाही. याचं कारण आहे ते म्हणजे उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्याबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी केलेलं वक्तव्य आणि व्हायरल झालेला व्हीडिओ.
ADVERTISEMENT
काय म्हणाले होते उद्धव ठाकरे दसरा मेळाव्यात?
शिवरायांना राज्याभिषेक करताना उत्तर प्रदेशातून इथे आले होते. हा कसला योगी हा तर भोगी आहे. योगी असेल तर मुख्यमंत्री कसा होऊ शकतो? योगी असेल तर सगळा त्याग करून गुहेत जाऊन बसायला हवं होतं. मात्र हा मुख्यमंत्र्यांच्या खुर्चीत जाऊन बसलो. हा योगी आला तो असा टरटरून.. म्हणजे गॅसचा फुगा असतो ना? तसा हा योगी आला आणि चपला घालून महाराजांच्या प्रतिमेला हार घालण्यासाठी गेला. असं वाटलं त्याच चपला घ्याव्यात आणि त्याचं थोबाड फोडावं. लायकी तरी आहे का? महाराजांच्या पुतळ्याजवळ जायची लायकी तरी आहे का?
बीडीडी चाळीच्या पुनर्विकास कार्यक्रमाच्या वेळी काय म्हणाले होते उद्धव ठाकरे?
थप्पडसे डर नहीं लगता, थपडा बऱ्याच खाल्ल्या आहेत. त्यापेक्षा दामदुपटीने परतही दिल्या आहेत.आमच्या नादी लागू नका अशी एक झापड देऊ की परत उठणार नाही. असंही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी म्हटलं होतं.
या संदर्भातला व्हीडिओ व्हायरल झाला होता. नारायण राणे यांनीही पत्रकार परिषद घेऊन या दोन मुद्द्यांचा आधार घेतला होता. तसंच अमित शाह यांना विधानसभेत जे काही उद्धव ठाकरे बोलले होते ते उदाहरणही त्यांनी दिलं. एवढंच नाही तर त्यांनी शिवसेनेला इशाराही दिला आहे. मी सगळ्यांना पुरून उरलो आहे असंही त्यांनी शिवसेनेला सुनावलं आहे. दरम्यान भाजपनेही शिवसेनेला जशास तसं उत्तर देण्याचं ठरवलं आहे. भाजप आता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याविरोधात तक्रार दाखल करणार आहे. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्याबद्दल दसरा मेळाव्यात केलेल्या वक्तव्यावरुन, भाजप आता उद्धव ठाकरेंविरुद्ध तक्रार दाखल करणार आहे. यवतमाळ जिल्ह्यातील 5 पोलीस ठाण्यात भाजपकडून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याविरोधात तक्रारी केल्या जाणार आहेत. त्याबाबतची माहिती भाजपचे यवतमाळ जिल्हाध्यक्ष नितीन भुतडा यांनी दिली.
ADVERTISEMENT