एकनाथ शिंदेंसह 40 आमदारांच्या बंडखोरीनंतर खरी शिवसेना कुणाची? हा प्रश्न गेल्या काही महिन्यांपासून महाराष्ट्रात चर्चिला जात आहे. सर्वोच्च न्यायालयाने या प्रकरणी निर्णय घेण्यास संमती दिल्यानंतर केंद्रीय निवडणूक आयोगाने कार्यवाही सुरू केली होती. ठाकरे गट आणि शिंदे गटाने आपापल्या बाजूने पुरावे सादर केले असून, या प्रकरणाची आज सुनावणी होणार आहे. त्यामुळे सगळ्यांचे कान निवडणूक आयागाच्या निर्णयाकडे असणार आहे.
ADVERTISEMENT
महाराष्ट्राच्या राजकारणातील एका महत्त्वाच्या प्रकरणाची सुनावणी आज केंद्रीय निवडणूक आयोगासमोर होणार आहे. तत्कालिन नगरविकास मंत्री आणि शिवसेनेचे नेते एकनाथ शिंदे यांनी बंड केल्यानंतर शिवसेनेला मोठा हादरा बसला. बंडानंतर एकनाथ शिंदेंनी थेट शिवसेना पक्ष नाव आणि धनुष्याबाण निवडणूक चिन्हावरच दावा केलाय. शिंदे गट हीच खरी शिवसेना असल्याचा दावा शिंदेंनी निवडणूक आयोगकडे केलेला आहे.
केंद्रीय निवडणूक आयागाकडे एकनाथ शिंदेंनी शिवसेनेवर दावा केल्यानंतर हे प्रकरण सर्वोच्च न्यायालयात गेलं होतं. सर्वोच्च न्यायालयाने सुरूवातीला निवडणूक आयोगाला प्रकरण जैसे थे ठेवण्याची सूचना केली होती. त्यानंतर न्यायालयाने खरी शिवसेना कुणाची प्रकरणाची सुनावणी घेण्यास हिरवा कंदील दाखवला. त्यानंतर निवडणूक आयोगाने या प्रकरणाची कारवाई सुरू केली होती.
केंद्रीय निवडणूक आयोगाने ठाकरे गट आणि शिंदे गटाला पुरावे सादर करण्यासाठी 23 नोव्हेंबरची तारीख दिली होती. त्याचबरोबर 12 डिसेंबर ही तारीख सुनावणीसाठी निश्चित करताना आणखी काही कागदपत्रे सादर करावयाची असल्यास 9 डिसेंबरपर्यंत सादर करण्यास मुभा दिली होती.
ठाकरे विरुद्ध शिंदे : कुणाच्या पाठिशी किती प्रतिनिधी?
ठाकरे गटाने निवडणूक आयोगासमोर केलेले दावे
-राष्ट्रीय कार्यकारणी प्रतिनिधी – 160
-संघटनात्मक प्रतिनिधी – 2,82,975
-प्राथमिक सदस्य – 19,41,815
– एकूण 22 लाख 24 हजार 950
शिंदे गटाने केलेले दावे
– खासदार – 12
– आमदार – 40
– संघटनात्मक प्रतिनिधी – 711
– स्थानिक स्वराज्य संस्था प्रतिनिधी – 2046
– प्राथमिक सदस्य – 4,48,318
– एकूण 4 लाख 51 हजार 127
शिवसेना आणि धनुष्यबाण कुणाला मिळणार?
अंधेरी विधानसभा पोटनिवडणुकीत शिंदे गटाने तक्रार केल्यानंतर केंद्रीय निवडणूक आयोगाने शिवसेना नाव आणि धनुष्यबाण चिन्ह गोठवलं होतं. ठाकरे गटाला शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) हे नाव आणि मशाल निवडणूक चिन्ह दिलं, तर शिंदे गटाला बाळासाहेबांची शिवसेना आणि ढाल-तलवार हे चिन्हं दिलं होतं.
पोटनिवडणुकीत ठाकरेंच्या उमेदवार ऋतुजा लटके विजयी झाल्या, मात्र आगामी मुंबई महापालिकेसह राज्यातील इतर महापालिका आणि स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीच्या दृष्टीने निवडणूक आयोगाच्या निर्णयाकडे ठाकरे-शिंदे गटासह भाजप आणि महाविकास आघाडीचं लक्ष लागलेलं आहे.
ADVERTISEMENT