देवेंद्र फडणवीस यांनी दिवाळीच्या अनौपचारिक चर्चांमध्ये एक वक्तव्य केलं होतं. महाराष्ट्राच्या राजकारणात कटुता खूप वाढली आहे. ही कटुता संपली पाहिजे असं वक्तव्य उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं होतं. महाराष्ट्राच्या राजकारणात कधी नव्हे एवढी कटुता आल्याचं हे त्यांनी मान्य केलं. त्यावर आता उद्धव ठाकरे यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला आहे आणि सामनाच्या अग्रलेखात देवेंद्र फडणवीस यांचं कौतुक केलं आहे.
ADVERTISEMENT
काय म्हटलं आहे सामनाच्या अग्रलेखात?
महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ऐन दिवाळीत सामोपचाराच्या, शहाणपणाच्या गोष्टी केल्या आहेत. याबद्दल त्यांचं अभिनंदन करावं तेवढं थोडंच आहे. देवेंद्र फडणवीस यांचा मूळ स्वभाव सामोपचाराने मिळून मिसळून वागण्याचाच होता. मात्र सत्ता गेल्यामुळे ते बिघडले. सत्ता येते आणि जाते. माणसाने मूळ स्वभाव बदलण्याची गरज नाही. विजयाचा आनंदा होत असला तरीही नंतर उन्माद चढणे हे प्रौढत्वाचं लक्षण मानलं जात नाही. देवेंद्र फडणवीस यांच्यात सत्तांतरापासून प्रौढपणा आला आहे हे जाणवू लागले आहे.
देवेंद्र फडणवीस यांंचं अभिनंदन
दिवाळीनिमित्त पत्रकारांशी जो संवाद देवेंद्र फडणवीस यांनी साधला त्यात दोन महत्त्वाचे मुद्दे त्यांनी मांडले. महाराष्ट्राने त्यावर विचार करायला हवा. “महाराष्ट्राच्या राजकारणात कधी नव्हे एवढी कटुता आली आहे” हे देवेंद्र फडणवीस यांनी मान्य केलं. महाराष्ट्राच्या राजकारणात फक्त कटुताच नाही तर सूडाच्या राजकारणाचे विषारी प्रवाह उसळत आहेत. या प्रवाचं मूळ भाजपच्या अलिकडच्या राजकारणात आहे. या विषाचं अमृत करण्याचं कामही फडणवीस यांनाच करावं लागेल. कारण त्यांना यासारख्या गोष्टीची खंत वाटते आहे.
पुढे देवेंद्र फडणवीस असं म्हणाले की “महाराष्ट्राच्या राजकारणातली कटुता राजकीय वैमनस्यापर्यंत गेली आहे. महाराष्ट्राची राजकीय संस्कृती असी नाही. राजकीय मतभेद असले तरीही सर्व पक्षांचे नेते एकमेकांशी बोलू शकतात. त्यामुळे ही कटुता कशी कमी करता येईल यासाठी मी प्रयत्न करणार आहे.”
महाराष्ट्राच्या राजकारणात तीन सत्तांतरं
महाराष्ट्राच्या राजकारणात कटुता का आणि कुणी निर्माण केली? महाराष्ट्रात गेल्या अडीच वर्षाततीन सत्तांतरं झाली. त्यातली दोन सत्तांतरं थेट देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात झाली आहे. अजित पवार यांच्या मदतीने देवेंद्र फडणवीस यांनी सत्तांतर करण्याचा प्रय़त्न केला. तो फसला. त्यावेळीही केंद्रीय यंत्रणांचा पुरेपूर गैरवापर केला गेला. हा प्रयोग यशस्वी झाला असता तर तो लोकमताचा कौल किंवा जनतेची किंवा परमेश्वराची इच्छा ठरली असती. पण महाविकास आघाडीचा प्रयोग यशस्वी होताच हे घटनाबाह्य आणि लोकांचा पाठिंबा नसलेलं सरकार आहे असं सांगितलं गेलं. हा दुटप्पीपणा चांगला नाही. प्रामाणिकपणे बोलत आहात तर त्यात गल्लत का करता? महाराष्ट्राच्या राजकारणात कटुता राहू नये म्हणून राज्याच्या कल्याणासाठी सगळ्यांनी एकत्र आलं पाहिजे ही राज्याची परंपरा आहे.
…तर फडणवीस आज वर्षा बंगल्यावर दिसले असते
शिवसेना नष्ट करण्यासाठी सर्व येरागबाळ्यांची मोट बांधणं हा काही प्रामाणिकपणा नाही. खरी शिवसेना कोणती हे फडणवीसांना पक्के माहित आहे.त्यांनी खरी शिवसेना म्हणून गळ्यात धोंडा बांधून घेतला आहे. तो महाराष्ट्राला घेऊन बुडणार आहे. शिवसेनेला शब्द देऊन अडीच वर्षांचं मुख्यमंत्रीपद नाकारलं तिथेच कटुतेची ठिणगी पडली. मग आता फुटलेल्या मिंधे गटाला मुख्यमंत्रीपद देऊन आम्ही मुख्यमंत्रीपदाचा शब्द पाळला अशा चिपळ्या वाजवण्याचं कारण काय? हेच वचन आधी पाळलं असतं तर राज्यात कटुता निर्माण झाली नसती. देवेंद्र फडणवीस हे सागर बंगल्यावर खुश आहेत. मात्र भाजपने गेल्यावेळी दिलेला शब्द पाळला असता तर देवेंद्र फडणवीस आज वर्षावर दिसले असते. आ्ही एका नात्याने त्यांच्याकडे फराळास गेलो असतो.
ADVERTISEMENT