संयुक्त राष्ट्रे संघटनेच्या सुरक्षा परिषदेत रशियाने युक्रेनवर केलेल्या हल्ल्यांच्या निषेधाचा प्रस्ताव मांडण्यात आला होता. या प्रस्तावावर भारत काय भूमिका घेतो, याकडे सगळ्यांच्या नजरा होत्या. मात्र, भारताने या प्रस्तावावरील मतदान प्रक्रियेतच भाग घेतला नाही.
ADVERTISEMENT
भारतीय प्रमाणवेळेनुसार शुक्रवारी मध्यरात्री संयुक्त राष्ट्रे संघटनेच्या सुरक्षा परिषदेची महत्त्वाची बैठक पार पडली. याच बैठकीत रशियाने केलेल्या हल्ल्यांच्या निषेधार्थ प्रस्ताव मांडण्यात आला होता. या प्रस्तावावर 15 देशांना मतदान करायचं होतं. मात्र, भारताने मतदान न करण्याचा निर्णय घेतला.
Russia-Ukraine war : युक्रेनच्या राष्ट्राध्यक्षांचा पंतप्रधान मोदींना फोन
11 देशांनी प्रस्तावाला समर्थन दिलं, तर भारतासह चीन आणि युएईने मतदान प्रक्रियेत भाग घेतला नाही. सुरक्षा परिषदेचा स्थायी सदस्य असल्याने रशियाने ‘व्हेटो’ अधिकारांचा वापर करत प्रस्ताव रोखला. सुरक्षा परिषदेतील पाच सदस्य देशांकडेच ‘व्हेटो’ अधिकार आहे. रशियाबरोबर अमेरिका, चीन, फ्रान्स आणि ब्रिटनला ‘व्हेटो’ वापरण्याचा अधिकार आहे.
“रशियाचा ‘तो’ कट युक्रेननं उधळला”; राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांचा दावा
मतदान प्रक्रियेत भाग न घेतलेल्या भारताने यासंदर्भातील भूमिका स्पष्ट केली आहे. भारताने म्हटलं आहे की, “युक्रेनमध्ये अलिकडच्या काळात घडत असलेल्या घटनांमुळे भारत व्यथित आहे. शत्रुत्व आणि हिंसा संपवण्यासाठी सर्व प्रकारचे प्रयत्न करायला हवेत, असं आवाहन आम्ही करतो. माणसांच्या आयुष्याची किंमत मोजून कोणताही तोडगा निघू शकत नाही”, असं आवाहन भारताने केलं आहे.
“आम्ही युक्रेनमध्ये मोठ्या संख्येनं अडकलेल्या भारतीय विद्यार्थ्यांबरोबरच भारतीय नागरिकांच्या सुरक्षेबद्दल चिंतेत आहोत. सध्याची जागतिक व्यवस्था संयुक्त राष्ट्रांच्या चार्टरवर आधारित आहे. आंतरराष्ट्रीय कायदे आणि वेगवेगळ्या देशांचं सार्वभौमत्व आणि प्रादेशिक अखंडतेचा सन्मान करण्यावर आधारित आहे.”
अश्रू,आक्रोश आणि धगधगणारं युक्रेन!
“यातून विधायक मार्ग काढत असताना सर्वच सदस्य देशांनी या तत्त्वांचा आदर करण्याची गरज आहे. आजघडीला चर्चा हा मार्ग कितीही कठीण वाटत असला, तरी वाद आणि मतभेद संपवण्यासाठी चर्चाच एकमात्र पर्याय आहे. ही खेदाची गोष्ट आहे की मुत्सद्देगिरीचा मार्ग सोडून देण्यात आला, मात्र पुन्हा त्याच मार्गावर परतावंच लागेल. याच सर्व कारणांमुळे भारताने या प्रस्तावावर मतदान न करण्याचा पर्याय निवडला,” असं भारताने सुरक्षा परिषदेत सांगितलं.
भारताच्या भूमिकेबद्दल अमेरिका म्हणाली…
अमेरिकेचे परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते नेड प्राइस एका पत्रकार परिषदेत म्हणाले, “जसे भारताचे रशियासोबत संबंध आहेत, तसे अमेरिकेचे नाहीत. भारत-रशियातील संबंधाबद्दल अमेरिकाला कसलीही आपत्ती नाही. भारत आणि रशिया संरक्षण क्षेत्रात भागीदार आहेत आणि त्यांची मैत्री मजबूत आहे. अमेरिका आणि रशियातील संबंध असे नाहीत. रशियासोबत संबंध असलेल्या प्रत्येक देशाला आम्ही आंतरराष्ट्रीय नियमांनुसार संधी घेण्यास सांगितलं होतं”, असं प्राइस म्हणाले.
भारताच्या भूमिकेवर रशियाची प्रतिक्रिया काय?
भारताने मतदान न करण्याची भूमिका घेतल्याबद्दल रशियाने कौतूक केलं आहे. रशियाने म्हटलं आहे की, “युक्रेन मुद्द्यासंदर्भात भारताने ज्यापद्धतीने निष्पक्ष आणि समतोल भूमिका घेतली आहे; त्याच आम्ही कौतूक करतो. युक्रेन मुद्द्याबद्दल आम्ही भारताच्या संपर्कात राहण्यास कटिबद्ध आहोत”, असं रशियाने म्हटलं आहे.
ADVERTISEMENT