अनेक वर्षांनी केंद्रीय मंत्री अण्णा हजारेंच्या भेटीला राळेगणसिद्धी या ठिकाणी पोहचले. देशाचे केंद्रीय कृषी राज्य मंत्री कैलाश चौधरी, महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, राधाकृष्ण विखे पाटील आणि गिरीश महाजन यांनी आज पुन्हा एकदा अण्णा हजारे यांची भेट घेतली. स्वामीनाथन आयोगाच्या शिफारसी 2019 मध्ये लागू करण्याचं आश्वासन केंद्र सरकारने दिलं होतं. मात्र ते आश्वासन त्यांनी पाळलं नाही म्हणून अण्णा हजारे हे उपोषणाला बसत आहेत. 30 जानेवारीपासून म्हणजेच उद्यापासून त्यांनी आमरण उपोषण सुरु कऱण्याचा निर्णय घेतला आहे. त्यांनी हे पाऊल उचलू नये म्हणून केंद्रीय कृषी राज्यमंत्री कैलाश चौधरी यांनी आज अण्णा हजारेंची भेट घेतली. जवळपास सात ते आठ वर्षांनी केंद्रातील मंत्र्यानी अण्णा हजारेंची त्यांच्या गावी जाऊन भेट घेतली आहे.
ADVERTISEMENT
या भेटीनंतर देवेंद्र फडणवीस यांनी काय म्हटलं आहे?
“आम्ही गेल्या आठवडभरापासून अण्णा हजारे यांच्यासोबत चर्चा करतो आहोत. त्यांच्या मागण्यांबाबत आम्ही मसुदे दिले आहेत. आज झालेल्या चर्चेनंतर मार्ग निघेल असा मला विश्वास वाटतो आहे. अण्णा हजारेंनी उपोषणाला बसावं असं कुणालाही वाटत नाही. त्यांचं अजूनही काही म्हणणं असेल काही मुद्दे असतील तर ते विचारात घेऊन त्याप्रमाणे निर्णय घेतले जातील.”
काही दिवसांपूर्वीच अण्णा हजारे हे 2012 मध्ये झालेल्या आंदोलनादरम्यान त्यांना भाजप नेत्यांनी कसा पाठिंबा दिला होता, त्यांचं किती कौतुक केलं होतं ते व्हिडीओ पाहताना दिसले होते. त्याबाबत त्यांना विचारलं असता मी माझ्या उपोषण आंदोलनाच्या वेळी लाव रे तो व्हिडीओ म्हणणार आहे त्यावेळी या सगळ्या भाजपच्या नेत्यांनी माझं कौतुक केलं, माझ्या आंदोलनाचं कौतुक केलं पण आता माझ्या पत्राला साधं उत्तरही देण्याची तसदी घेत नाहीत असं म्हणत अण्णा हजारे यांनी उपोषण आंदोलनावर ठाम असल्याचं म्हटलं होतं. आता आज केंद्रीय कृषी राज्य मंत्री कैलाश चौधरी यांच्या भेटीनंतर अण्णा हजारे काय निर्णय घेतात ते पाहणं महत्त्वाचं आहे.
ADVERTISEMENT