नारायण राणे यांच्या जिवाला धोका आहे, पोलिसांनी त्यांना धक्काबुक्की केली असा गंभीर आरोप प्रसाद लाड यांनी केला आहे. नारायण राणे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याविरोधात वादग्रस्त वक्तव्य केलं होतं. त्याचे पडसाद आज राज्यभरात उमटले. नाशिक, पुणे, रायगड या ठिकाणी गुन्हा दाखल झाला होता. नाशिक पोलिसांनी कोकणात पथकं पाठवली. आता रत्नागिरी पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतलं आहे.
ADVERTISEMENT
भाजपचे कार्यकर्ते यांच्यात आणि पोलिसांमध्ये झटापट झाली नाही. आम्ही इतकंच सांगत होतो की तुम्हाला अटक करायचं असेल तर करा पण त्यांचं जेवण होऊ द्या कारण त्यांना उच्च रक्तदाब आणि मधुमेह यांचा त्रास आहे. डॉक्टरही चेक अप साठी बोलावले आहेत. मात्र चेक अपही होऊ दिलं नाही. बी.पी. देखील पाहू दिलं नाही. त्यामुळे ही हुकुमशाही आहे का? पोलिसांनी अद्याप नारायण राणेंना अटक दाखवलेली नाही. सहा वाजण्याच्या आधी अटक करून कोर्टापुढे हजर केलं पाहिजे पण तसं करत नसल्याने माझा हा आरोप आहे की राणे यांच्या जिवाला धोका आहे. असं प्रसाद लाड यांनी पत्रकारांना सांगितलं.
आणखी काय म्हणाले प्रसाद लाड?
आज गोळवली येथील रा.स्व. संघाच्या सेवा प्रकल्पाची पाहणी करत असताना रत्नागिरी पोलिसांनी वॉरंट नसताना केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना बेकायदेशीररित्या ताब्यात घेण्यात आलं. तिथून त्यांना संगमेश्वर पोलीस ठाण्यात नेले. तेथे त्यांना बाहेर गाडीतच बसवून ठेवले आहे. त्यांचा रक्तचाप वाढला असून त्यांना तातडीने वैद्यकीय मदतीची गरज आहे परंतु त्यांना वैद्यकीय मदतही दिली जात नाहीये असे प्रसाद लाड यांनी सांगितले.
प्रसाद लाड पुढे म्हणाले की केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना नुसतेच बसवून ठेवले आहे. ना कुठली कारवाई करत आहेत ना कसली माहिती देत आहेत. गोळवली प्रकल्पात नारायण राणे यांना पोलिसांनी भरल्या ताटावरून जेवताना अर्धवट उठवले असेही ते म्हणाले. ज्या अधिकाऱ्यांनी एफआयआर केला असे सांगितले जाते, ते पोलीस स्थानकात उपस्थित नाहीत. पोलीस सहकार्य करत नसल्याने आ.प्रसाद लाड पोलीस ठाण्यात उपोषणास बसले आहेत.
ADVERTISEMENT