दूरदृष्टी असलेला नेता अशी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची ओळख आहे. देशभरातले विविध महामार्ग बांधण्याचं आणि दळणवळणाच्या साधनांमध्ये विकास करण्याचं श्रेय जातं ते गडकरींना. नितीन गडकरींना रोडकरी असंही म्हटलं जातं ते याचमुळे.
ADVERTISEMENT
कार आणि इतर वाहनांमुळे होणारं वायू प्रदूषण रोखण्यासाठीही प्रयत्न केले जात आहेत. ग्रीन कार ही संकल्पनाही गडकरींनीच मांडली आहे. आज नितीन गडकरी यांनी हायड्रोजनवर चालणाऱ्या एका कारने संसदेत उपस्थिती लावली होती. टोयोटा मिराई असं या कारचं नाव आहे. टोयोटाने पायलट प्रोजेक्ट अंतर्गत ही कार तयार केली आहे. यामध्ये अत्याधुनिक सेल यंत्रणा म्हणजेच अॅडव्हान्स फ्युएल सिस्टिम बसवली आहे. सेल ऑक्सिजन आणि हायड्रोजन यांचं मिश्रण करून एका विशेष प्रक्रियेद्वारे वीज निर्मिती केली जाते त्याच मदतीने ही कार धावते.
काय म्हणाले आहेत नितीन गडकरी?
टोयोटाने आणलेली मिराई कार ही पूर्णतः पर्यावरणपूरक आहे. या कारमुळे कोणत्याच प्रकारचं प्रदूषण होत नाही. अशा प्रकारची कार भारताचं भविष्य आहे. पेट्रोल आणि डिझेलवरची वाहनं ही मोठ्या प्रमाणावर प्रदूषण करतात. मात्र हायड्रोफ्युएलमुळे प्रदूषण होत नाही. पेट्रोल आणि डिझेल या दोन्हींच्या किंमती वाढल्या आहेत. त्यासाठी बॅटरी गाड्या, इलेक्ट्रीक वाहनं यांना प्रोत्साहन दिलं जातं आहे. CNG ची संकल्पनाही याचमुळे जन्माला आली आहे. आता हायड्रोफ्युएलचा पर्याय समोर आला आहे.
टोयोटा मिराई या कारमधल्या मिराई नावाचा अर्थही गडकरी यांनी समजावून सांगितला. जपानी भाषेत मिराई या शब्दाचा अर्थ जपानी भाषेत भविष्य असा होतो. त्यामुळेच ही कार आपलं भविष्य आहे असं नितीन गडकरी यांनी स्पष्ट केलं.
हायड्रोजन फ्युएल कारच्या फिचर्सबद्दल बोलायचं झालं तर यामध्ये इंधन भरणं सोपं आहे. पेट्रोल आणि डिझेल याप्रमाणे हे फ्युएलही २ ते ३ मिनिटात भरलं जातं. हायड्रोजन पॉवर कार प्रेशर टँकमध्ये हायड्रोजन साठवता येतं. त्यानंतर ते वीज निर्मितीत फ्युएल सेलमध्ये हस्तांतरित केलं जातं.
आणखी काय म्हणाले नितीन गडकरी?
पेट्रोल डिझेल आणि गॅसचे दर सातत्याने वाढत आहेत. आपण ते आयाच करतो आणि पेट्रोल-डिझेलमुळे मोठ्या प्रमाणात प्रदूषण होतं. त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं आत्मनिर्भर भारताचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी आपल्याला तेलाच्या बाबतीतही स्वयंपूर्ण व्हायला हवं. त्यासाठी अशा प्रकारची कार हे महत्त्वाचं पाऊल आहे असंही नितीन गडकरींनी म्हटलं आहे.
टोयोटाने भारतातील पहिली हायड्रोजन इंधन सेलवर चालणारे इलेक्ट्रिक कार Mirai लाँच केली आहे. या टोयोटा मिराई कारमध्ये हायड्रोजन इंधन सेल बॅटरी पॅक दिला आहे. विशेष म्हणजे इलेक्ट्रिक कारपेक्षा या वाहनाची रेंज जास्त आहे. ही कार सिंगल चार्जमध्ये ही 600 किमी पर्यंत चालत असल्याचा कंपनीचा दावा आहे. या कारमध्ये हायड्रोजनचे रुपांतर विजेमध्ये होते, ज्यामुळे इंजिनला शक्ती मिळते. यातून फक्त पाणी बाहेर टाकले जाते त्यामुळे ही कार पूर्णपणे पर्यावरण पुरक आहे असंही गडकरी यांनी सांगितलं.
ADVERTISEMENT