महाराष्ट्राच्या बळीराजामागे लागलेली निसर्गाची अवकृपा काहीकेल्या कमी होत नाहीये. काही महिन्यांपूर्वी ओल्या दुष्काळातून सावरलेला शेतकरी आता कुठे उभारी घेतो न घेतो तोच अवकाळी पावसाने त्याचं कंबरडं मोडलं आहे. राज्यात अनेक ठिकाणी झालेल्या अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेलं पिक वाया गेलं आहे.
ADVERTISEMENT
सांगली, सातारा, पुणे ग्रामीण, नाशिक या भागात पावसाने हजेरी लावल्यामुळे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालं आहे. पावसाने कुठेकुठे शेतकऱ्यांच्या तोंडचं पाणी पळवलं आहे त्याचा आढावा घेणार आहोत.
१) सांगली – सांगली जिल्ह्यात रात्रभर जोरदार पाऊस सुरु आहे. पाऊस आणि ढगाळ वातावरणामुळे या जिल्ह्यातील द्राक्ष बागायतदारांना मोठा फटका बसला आहे. तासगाव तालुक्यातील शेतकऱ्यांचं या पावसात मोठं नुकसान झालं असून अनेक द्राक्ष बागांमध्ये पाणी साचलं आहे. या पावसामुळे हातातोंडाशी आलेलं पिक कुजण्याची भीती शेतकऱ्यांना आहे. यातून सावरण्यासाठी औषध फवारणीचा जास्तीचा खर्च शेतकऱ्यांच्या मानगुटीवर येऊन बसला आहे.
२) जुन्नर – गेल्या दोन-तीन दिवसांपासून पुणे जिल्ह्याच्या जुन्नर, आंबेगाव, शिरूर, खेड या तालुक्यांत सततचे ढगाळ हवामान, धुके आणि अवकाळी पाऊस यामुळे कांदा पीक धोक्यात आलंय. वातावरणातील बदलामुळे कांदा पिकावर रोगाचा प्रादुर्भाव वाढला असून कांदा पिवळा पडून मावा, करपा यांसारख्या रोगांनी कांदा शेतातच नामशेष होण्याच्या मार्गावर आहे. काही ठिकाणी काढणीला आलेला कांदा ही अवकाळी पाऊस आणि वातावरणातील बदलामुळे शेतातच सडायला लागला आहे. त्यामुळे कांदा उत्पादक शेतकय्रांच्या चिंता वाढल्या आहेत. अपार मेहनत आणि कष्ट करून पिकवलेलं कांद्याचं पिक निसर्गाच्या लहरीपणामुळे डोळ्यासमोर खराब होत असल्याने बळीराजाच्या डोळ्यात पाणी आलंय.
ADVERTISEMENT