मुंबईसह महाराष्ट्रात सर्वाधिक कोरोनाग्रस्त रुग्णसंख्या असतानाही केंद्र सरकारकडून मिळत असलेल्या कमी लसींमुळे गेल्या काही दिवसांपासून राज्य आणि केंद्रात राजकारण सुरु आहे. अखेरीस शनिवारी सकाळी मुंबई महापालिकेला १ लाख कोविशील्ड लसी मिळाल्या. परंतू यानंतरही मुंबईच्या लसीकरण केंद्रावर नागरिकांच्या रांगा पहायला मिळाल्या.
ADVERTISEMENT
१ लाख लसींचा साठा मिळाल्यानंतर मुंबई महापालिकेच्या ४९ केंद्रांवर या लसींचं वितरण करण्यात आलं. परंतू ही लस कधीपासून देण्यात येणार आहे याबद्दल माहिती मिळाली नसल्यामुळे गोरेगावच्या NESCO ग्राऊंडबाहेर लोकांची भलीमोठी रांग पहायला मिळाली. NESCO ग्राऊंडबाहेरील लसीकरण केंद्रावर काही ठिकाणी लस संपली आहे अशी पोस्टर्स लावण्यात आली होती…तर काही ठिकाणी पोस्टरवर शनिवार-रविवार लसीकरणाची वेळ सकाळी ९ ते ५ असं लिहीलं होतं. परंतू महापालिकेकडून प्रत्यक्षात लस द्यायला कधीपासून सुरुवात होईल याची कोणतीच माहिती दिली गेलेली नसल्यामुळे केंद्रबाहेर नागरिक ताटकळत उभे राहिलेले दिसले.
महाराष्ट्रातला लस तुटवडा भरून काढण्यासाठी मोदी सरकारने विचार करावा-संजय राऊत
लसीकरण ९ वाजता सुरु होणार असलं तरीही मुंबई महापालितकेने याची योग्य वेळेत माहिती दिली नसल्यामुळे आम्ही सहा वाजेपासून रांगेत वाट पाहत उभे असल्याची तक्रार काही नागरिकांनी मुंबई तक शी बोलताना केली. महत्वाची गोष्ट म्हणजे लसीकरण केंद्रावर असलेल्या सुरक्षा कर्मचाऱ्यांनी रांगेत उभ्या असलेल्या ज्येष्ठ नागरिकांनाही केंद्रात त्यांच्यासाठी केलेल्या सोयीच्या ठिकाणी सोडलं नाही, ज्यामुळे नागरिकांमध्ये नाराजी दिसली. अखेरीस साडेनऊ वाजल्यानंतर लसीकरण केंद्राचं गेट उघडल्यानंतर लोकांना आत प्रवेश देण्यात आला.
घडलेल्या प्रकाराबद्दल NESCO च्या डीन डॉ. नीलम अंद्राडे यांना विचारलं असता, “आम्ही सकाळी लसीचे डोस आणण्यासाठी गाडी पाठवली होती. ती लस येईपर्यंत आम्ही कोणालाही आत सोडू शकत नाही. ज्या क्षणी आमच्या गाडीने लसीचे डोस आपल्या ताब्यात घेतल्याचं आम्हाला कळलं त्यावेळी आम्ही लगेच लोकांना आत प्रवेश द्यायला सुरुवात केली. लसीकरणाची वेळ ही ९ वाजताची आहे. त्याआधी कोणीही केंद्रावर गर्दी करु नये असं आम्ही वारंवार सांगत असतो. परंतू लोकं अनावश्यक गर्दी करतात. सर्व लोकांना आत बसण्याची पुरेशी सोय आहे, त्यामुळे कोणाही घाबरुन जाण्याची गरज नाही”, अशी माहिती दिली.
ADVERTISEMENT