MNS: राज ठाकरेंच्या भेटीनंतर वसंत मोरे म्हणाले ‘जय श्रीराम!’

मुंबई तक

• 10:14 AM • 11 Apr 2022

मुंबई: मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या मशिदीवरील भोंग्यांविषयी विपरीत भूमिका घेणारे मनसेचे पुण्यातील नगरसेवक वसंत मोरे यांनी आज (11 एप्रिल) मुंबईत ‘शिवतीर्था’वर येऊन राज ठाकरेंची भेट घेतली. या भेटीनंतर वसंत मोरे यांनी आपल्या अधिकृत फेसबुक पेजवर राज ठाकरेंसोबतचा एक फोटो पोस्ट केला आहे. ज्यासोबत त्यांनी ‘जय श्रीराम’ असंही म्हटलं आहे. त्यामुळे आता सर्वांच्याच भुवया उंचावल्या […]

Mumbaitak
follow google news

मुंबई: मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या मशिदीवरील भोंग्यांविषयी विपरीत भूमिका घेणारे मनसेचे पुण्यातील नगरसेवक वसंत मोरे यांनी आज (11 एप्रिल) मुंबईत ‘शिवतीर्था’वर येऊन राज ठाकरेंची भेट घेतली. या भेटीनंतर वसंत मोरे यांनी आपल्या अधिकृत फेसबुक पेजवर राज ठाकरेंसोबतचा एक फोटो पोस्ट केला आहे. ज्यासोबत त्यांनी ‘जय श्रीराम’ असंही म्हटलं आहे. त्यामुळे आता सर्वांच्याच भुवया उंचावल्या आहेत.

हे वाचलं का?

ज्या मशिदीवरील भोंगे सुरु होतील त्याच्यासमोर दुप्पट स्पीकर लावून त्यावर हनुमान चालीसा लावायचं. असा आदेश राज ठाकरे यांनी गुढीपाडवा मेळाव्यात मनसैनिकांना दिला होता. पण राज ठाकरेंचा हाच आदेश वसंत मोरे यांनी मानला नव्हता. आपल्या मतदारसंघात मोठ्या प्रमाणात मुस्लिम मतदार आहेत आणि त्यांनी आपल्याला भरभरुन मतदान केलं आहे. त्यामुळे त्यांना दुखावता येणार नाही. असं म्हणत वसंत मोरे यांनी एक प्रकारे राज ठाकरेंच्या भूमिकेलाच विरोध केला होता.

यानंतर ते गेले काही दिवस सातत्याने तीच भूमिका मांडत आपल्या मतदारसंघात फिरत होते. मुस्लिम मतदार जास्त असल्याने जर हनुमान चालीसा लावला तर त्याचा फटका आगामी निवडणुकीत बसू शकतो. ही बाब लक्षात घेऊन वसंत मोरेंनी असं काहीही करण्यास नकार दिला.

Exclusive: राज ठाकरेंना भेटण्याआधी वसंत मोरे म्हणाले की…

याच दरम्यान, मुंबईत राज ठाकरे यांनी एक तातडीची बैठक घेऊन वसंत मोरे यांना पुण्याच्या शहराध्यक्ष पदावरुन हटवलं आणि त्यांच्याऐवजी साईनाथ बाबर यांची नेमणूक केली. यानंतर वसंत मोरे नाराज असल्याच्या जोरदार चर्चा सुरु झाला.

मात्र, असं असताना आज (11 एप्रिल) राज ठाकरे यांनी वसंत मोरेंना शिवतीर्थावर बोलावून घेतलं. ज्यानंतर वसंत मोरे यांची राज ठाकरेंशी सविस्तर चर्चा झाली. याच चर्चेनंतर वसंत मोरे यांनी फेसबुकवर फोटो शेअर केला आणि त्याला कॅप्शन देताना असं म्हटलं की, ‘मी माझ्या साहेबांसोबत… आयुष्यात संघर्षाचा वनवास भोगल्याशिवाय सुखाचा राजयोग येत नाही…! जय श्रीराम’

राज ठाकरेंच्या भेटीनंतर वसंत मोरे यांनी पुन्हा एकदा ‘जय श्रीराम’ म्हटल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.

‘उद्याच्या सभेला ये, तुला उत्तर मिळतील’; राज ठाकरे-वसंत मोरेंच्या बैठकीत काय झालं?

राज ठाकरेंच्या भेटीनंतर काय म्हणाले वसंत मोरे?

राज ठाकरेंच्या भेटीनंतर माध्यमांशी बोलताना वसंत मोरे म्हणाले, “माझ्या सगळ्या शंका दूर झाल्या आहेत. माझं सगळं बोलणं झालंय. मला ठाण्याच्या सभेला यायला सांगितलं. ठाण्याच्या सभेला ये, तुला सगळ्या प्रश्नांची उत्तरं मिळतील, असं राज ठाकरे मला म्हणाले आहेत. मला आणि साईनाथ बाबर यांना बोलवलं आहे.”

“उद्या सभा झाल्यानंतर सगळ्यांसोबत राज ठाकरे बोलणार आहे. भेटीनंतर मी शंभर टक्के समाधानी आहे. समाधानी होऊनच मी इथून चाललो आहे. उलट सुलट चर्चा केल्या जात होत्या, मात्र मी मनसेमध्ये आहे आणि मनसेमध्येच राहणार आहे,” असं वसंत मोरे यांनी सांगितलं.

    follow whatsapp