पुणे मनसे म्हटलं की, एक नाव हमखास घेतलं जात, ते म्हणजे वसंत मोरे! मनसेचे पुण्याचे माजी शहराध्यक्ष आणि माजी नगरसेवक असलेले वसंत मोरे गेल्या वर्षभरापासून राजकीय वर्तुळात चर्चेत आहेत. काही दिवसांपूर्वी वसंत मोरे नाराज असल्याच्या चर्चेनं डोकं वर काढलं. अजित पवारांनी ऑफर दिल्याची चर्चाही जोरात झाली. त्यामुळे अमित ठाकरे यांनी वसंत मोरेंची भेट घेतली. या भेटीनंतर वसंत मोरेंनी एका व्हिडीओतून महाराष्ट्र नवनिर्माण सोडणार नसल्याचं स्पष्टपणे सांगत पक्षांतराच्या शक्यतांवर पडदा टाकलाय.
ADVERTISEMENT
पुण्याच्या शहराध्यक्ष पदावरून वसंत मोरे यांना हटवण्यात आल्यानंतर मोरे पक्षांतर करतील, अशी चर्चा सुरू झाली होती. त्यावेळी त्यावर पडदा पडला. त्यानंतर आता काही दिवसांपूर्वी वसंत मोरेंनी पक्षातील काही नेत्यांवरील नाराजी उघडपणे व्यक्त केली होती.
पुणे मनसेतील काही नेते पक्षापासून आणि पक्षाच्या कार्यक्रमापासून आपल्याला दूर ठेवत असल्याचा आरोप वसंत मोरेंनी केला होता. याच काळात विरोधी पक्षनेते आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये येण्याची ऑफर दिली होती. पक्षातील नेत्यांकडून डावललं जात असतानाच पवारांनी ऑफर दिल्यानं वसंत मोरे राष्ट्रवादी काँग्रेसचं घड्याळ हाती बांधणार, या चर्चेला हवा मिळाली होती.
मनसेच्या गोटात हालचालींना वेग; अमित ठाकरेंची वसंत मोरेंशी बैठक : मध्यस्थी यशस्वी होणार?
दरम्यान, वसंत मोरे यांची अमित ठाकरे यांनी भेट घेतली आणि त्यानंतर वसंत मोरेंनी मनसे सोडणार की नाही, याबद्दल स्पष्टपणे भूमिका मांडली.
वसंत मोरे यांनी व्हिडीओतून मांडली भूमिका
अमित ठाकरे यांच्या भेटीनंतर वसंत मोरे यांनी एका व्हिडीओतून पक्षांतराच्या चर्चांना उत्तर दिलंय. वसंत मोरेंनी राज ठाकरे आणि त्यांचं स्वतः बॅनर या व्हिडीओत दाखवलं आहे. एका कार्यक्रमातील हे दोन्ही बॅनर बांधलेली आहेत. त्या बॅनरचा व्हिडीओ दाखवून वसंत मोरेंनी मनसे सोडणार की नाही, या विषयाला उत्तर दिलंय. या व्हिडीओत वसंत मोरे सुरूवातीलाच म्हणतात की, ‘तुम्हाला एक गंमत दाखवतो म्हणजे तुम्हाला कळेल की वसंत मोरे आणि राज ठाकरे यांचं नात काय आहे?’
भोंगे हटवण्याच्या मुद्द्यापासून वसंत मोरेंची नारजी आलीये समोर
राज ठाकरे यांनी मशिदीवरील भोंगे हटण्यासंदर्भात भूमिका घेतल्यापासून वसंत मोरे सातत्याने त्यांची नाराजी व्यक्त करताना दिसत आहे. मशिदीवरील भोंगे हटवण्याच्या मागणीबद्दल मनसेनं राज्यभर आंदोलन केलं, त्यावेळी वसंत मोरे तिरुपती बालाजीच्या दर्शनासाठी गेले होते. महत्त्वाचं म्हणजे ठाण्यात झालेल्या सभेत त्यांनी एकही शब्द भोंगे हटवण्याच्या मुद्दा काढला नव्हता.
मी पक्षातील दहशतवादी आहे का? राज ठाकरेंकडे किती तक्रारी करायच्या? वसंत मोरे भडकले
वसंत मोरे यांना पुणे शहराध्यक्षपदावरून बाजूला करण्यात आल्यानंतरही ते नाराज झाल्याचं दिसलं. तेव्हापासून वसंत मोरे यांची नाराजी लपून राहिलेली नाही. नाराज वसंत मोरेंना राज ठाकरेंनीही काही महिन्यापूर्वी भेटीसाठी बोलावलं होतं.
ADVERTISEMENT