महाराष्ट्रात येऊ घातलेला फॉक्सकॉन कंपनीचा 1.54 लाख कोटींचा एक मोठा प्रोजेक्ट आता गुजरातमध्ये होणार आहे. सेमीकंडक्टर निमिर्ती प्रोजेक्ट महाराष्ट्रात आणण्यासाठी राज्य सरकारडून तैवानमधील कंपनीसोबतची चर्चा अंतिम टप्प्यात होती. मात्र, आता हा प्रोजेक्ट गुजरातमध्ये वेदांता कंपनी उभारणार आहे.
ADVERTISEMENT
आंतरराष्ट्रीय आर्थिक सेवा केंद्र हे महत्त्वाचं केंद्र मुंबईतून गुजरातला हलवण्यात आल्यानंतर राज्यात राजकारण तापलं होतं. त्यानंतर आता महाराष्ट्रात येऊ घातलेला आणखी एक मोठा प्रोजेक्ट गुजरातमध्ये गेला आहे. त्यामुळे याचे पडसाद राज्याच्या राजकारणात उमटण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
महाराष्ट्रात येऊ घातलेला १.५४ लाख कोटी रुपयांचा सेमीकंडक्टर प्रोजेक्ट आता गुजरातमध्ये होणार आहे. सेमीकंडक्टर निर्मितीचा प्रोजेक्ट महाराष्ट्रात आणण्यासाठी राज्य सरकारकडून बोलणी सुरू होती. ही प्रक्रिया अंतिम टप्प्यात असतानाच आता वेदांता सेमीकंडक्टर प्लांट गुजरातमध्ये उभारणार असल्याचं निश्चित झालंय. त्यामुळे पुन्हा एकदा महाराष्ट्रातील एक मोठा प्रोजेक्ट गुजरातला पळवल्याच्या चर्चेला तोंड फुटलं आहे.
फॉक्सकॉन सेमीकंडक्टर प्रोजेक्ट काय?
ऑटो आणि स्मार्टफोन इंडस्ट्रीसह अत्याधुनिक उपकरणांसाठी महत्त्वाच्या असलेल्या सेमीकंडक्टर निर्मितीचा भारतात तुडवडा निर्माण झाला आहे. त्यामुळे भारतातच सेमीकंडक्टर उत्पादनासाठी प्रयत्न सुरू होते. सेमीकंडक्टर निर्मितीचा प्रोजेक्ट महाराष्ट्रात उभारण्यासाठी महाराष्ट्र सरकारकडून प्रयत्न सुरू होते. तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या सरकारच्या काळात तैवानमधील फॉक्सकॉन आणि खनिकर्म क्षेत्रातील वेदांता या कंपन्यासोबत चर्चा सुरू झाली होती.
एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस यांचीही शिष्टमंडळासोबत झाली होती चर्चा
राज्यात सत्तांतर झाल्यानंतरही फॉक्सकॉन आणि वेदांता कंपन्यांच्या शिष्टमंडळासोबत बैठक झाली होती. एमआयडीसी अर्थात महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या ट्विटर हॅण्डलवर या बैठकीसंदर्भातील माहिती देण्यात आलेली आहे. २६ जुलै २०२२ रोजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची तैवानमधील फॉक्सकॉन आणि भारतीय वेदांता कंपनीच्या शिष्टमंडळाने भेट घेतली होती. सेमीकंडक्टर आणि डिस्प्ले फॅब उत्पादन निर्मिती प्रकल्प पुण्यात उभारण्यासंदर्भात ही चर्चा झाली होती. या प्रकल्पामुळे महाराष्ट्रात २ लाख रोजगार निर्मिती झाली असती.
वेदांता समुहाचे चेअरमन अनिल अगरवाल यांचं ट्विट, आदित्य ठाकरेंना आश्चर्याचा धक्का
फॉक्सकॉनचा सेमीकंडक्टर निर्मिती प्रोजेक्टची उभारणी वेदांता समूह करणार आहे. याबद्दलची माहिती वेदांता समुहाचे चेअरमन अनिल अगरवाल यांनी ट्विट करून दिली. फॉक्सकॉनचा सेमीकंडक्टर प्लांट गुजरातमध्ये उभारणार असून यामुळे आत्मनिर्भर सिलीकॉन व्हॅलीचं स्वप्न साकारण्यास मदत होणार आहे. भारताची सिलीकॉन व्हॅली आता एक पाऊल दूर आहे, असं अनिल अगरवाल यांनी म्हटलं आहे.
अनिल अगरवाल यांचं ट्विट बघून माजी मंत्री आणि आमदार आदित्य ठाकरेंनी आश्चर्य व्यक्त केलंय. हा प्रोजेक्ट भारतात होत असल्याचं पाहून मला आनंद होतोय, पण त्याबरोबर मला धक्काही बसला आहे. नव्या सरकारने ट्विट करून असून असा दावा केला होता की, हा प्रोजेक्ट महाराष्ट्रात आणला जातोय. मात्र, आता असं दिसतंय की हा प्रोजेक्ट महाराष्ट्रातून पाठवण्यासाठीच ते बांधील होते. आमच्या महाविकास आघाडी सरकारने हा प्रोजेक्ट अंतिम टप्प्यात आणला होता, असं आदित्य ठाकरेंनी म्हटलंय.
या प्रोजेक्टच्या यशामुळे भारतासाठी नवी क्षितिज खुली होतील. उद्योग आणि कंपनी यशस्वी व्हावी यासाठी माझ्या सदिच्छा आहेत. औद्योगिक क्षेत्रात निरोगी स्पर्धा करत इतर राज्यांच्या तुलनेत महाराष्ट्र भारताच्या प्रगतीत अव्वल राज्य बनावं असाच महाविकास आघाडीचा उद्देश होता, असंही आदित्य ठाकरेंनी म्हटलं आहे.
ADVERTISEMENT